स्पर्श

तू स्पर्श केलास आणि
शरीराचे लक्ष स्फटिक झाले
तुझ्या पायाशी आरास पडली
बांधलेलं चैतन्य मुक्त झालं
खोलीभर प्रकाश झाला
तो स्पर्शाचा क्षण
तुझ्या बोटावर
लख्ख गोंदला गेला
तू मूठ बंद केलीस
आणि प्रकाश सरला..
आता तुला हवं तेव्हा
एक चैतन्य
तुझ्या भवताल उतरतं..
पसरत राहतं
धुपाचा शुद्ध गंध
आहे त्याला
त्या चैतन्यात
जेव्हा जेव्हा
तू एकरूप होतोस
खोलीभर धुकं उरतं...

तुझ्या दैवी
मुठीत
असे कित्येक
प्रकाशकण
नांदतात
तुझ्या स्पर्शालाच
मुक्ती म्हणतात

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. हे एक स्तोत्र आहे..अग्निदेवतेचे.त्याच्या स्पर्शाने...सरणावरच्या शरीरात बद्ध झालेल्या चैतन्याला मुक्ती मिळाली..चैतन्य सूर्यदेवाच्या, अग्निदेवतेच्या चैतन्यात विलय पावलं..."तू मुठ बंद केलीस आणि प्रकाश सरला"..मावळतीला शांत झालास, हे अग्निदेवा!...प्रात:काळी "आता पुन्हा हवं तेव्हा,एक चैतन्य, तुझ्या भवताल उतरत" त्या सकाळच्या कोवळेपणात, भवतालात बागेश्रीला भूपाचा गंध....एक तरल भक्तीभाव स्पर्शून जातो...तोच लोप पावलेले चैतन्य सूर्यदेव पुन:प्रत्ययासाठी "तू एकरूप होतोस,खोलीभर धुके उरत..." पोहचवून आल्यावर लावलेली ज्यात मंद प्रकाशात तेवू लागते...त्या सूर्याच्या तेजोमयाची, चैतन्याची,प्रतिमा रेखन होत राहते, तिचा भवताल अस्तित्वमय होऊन जातो."तुझ्या दैवी मुठीत, असे कित्येक प्रकाशकण नांदतात" आणि ह्या अग्निदेवतेच्या "तुझ्या स्पर्शालाच मुक्ती म्हणतात"....सूर्य ही अग्निदेवता, चैतन्य शुद्ध गंध, तेवणारा दिवा, समई, प्रकाश कण, मुक्ती....किती भावस्पर्शी आहेत ह्या सर्व प्रतिमा, एकमेकांत मिसळून "स्पर्श" करत आहेत, आपल्या अंत:करणाला. दिव्यानुभव आहे, ह्या कवितेत.

    ReplyDelete