आत्मा संवाद

दार ढकलून आत गेले.
मनाचा दरवाजा करकरला.
एका कोपर्यात बसून स्वतःतच तल्लीन झालेल्या आत्म्याची समाधी भंग पावली.
जरा नाराजीनेच त्याने माझ्यावर नजर टाकली. शांत, खोल डोळे मला न्याहाळून पुन्हा शुन्यात हरवले.
तितकीच दखल घेतली गेली.
मी:  काय रे म्हातारा दिसायला लागला आहेस, एकाएकी. मागच्या भेटीपर्यंत कितीतरी उल्हासीत आणि  आनंदी वाटत होतास
तो:  आज कसं येणं केलंस?
मी:  तुला भेटण्याची ओढ
तो:  झाली आहे भेट, जाऊ शकतेस.
मी:  (तिथेच त्याच्या समोरच्या भिंतीला टेकून बसत) तुझं हे रूप अनपेक्षित होतं.
तो:  कारणीभूत तू आहेस
मी:  पण मी आनंदी आहे, तू वयस्क होण्याचं कारण काय? मागच्यावेळेस तू सांगितलं होतंस.. मी दु:खी रहायला लागले, त्यातच फिरायला लागले, की तू म्लान होत जाणार. तुझं वय कैक पटीनं वाढणार. ही उर्जा टपोरी रहावी म्हणून केलेले आनंदी राहण्याचे प्रयत्न तुला दिसत नाहीतच?
तो:  तेच, प्रयत्न. आनंदी राहण्याचे प्रयत्न आणि आनंदी असणं ह्यातला फरक जाणून घेतला नाहीस.
मी:  तू स्थलांतर करायचं ठरवलंच आहेस तर!
तो:  तुझ्या वळचणीला आलो होतो. पण तुलाही स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही.
मी:  मी, मी आहे. कुठल्याच जात, धर्म, विचारधारेची नाही. कुणाची नाही, कुणावर हक्क सांगत नाही. कुणापाशी काही मागत नाही. कुठल्या इच्छा मला बिलगत नाहीत, मी इच्छांना बिलगत नाही. अजून स्वातंत्र्याची काय व्याख्या करायची?
तो:  तू, तू आहेस?
मी:  हो.
तो:  मग इथे ह्या खोलीत उतरून वास्तव्याला आलेला, तुला म्हातारा वाटणारा कोण? तुझे डोळे पाहिलेस?
मी:  हो. अनेकदा
तो:  तुझ्या वयापेक्षा जास्त गहिरे नाहीत ते? त्यांचं वय, अनुभव तुझ्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे. ते चैतन्य लाखो वर्षांपूर्वीचं आहे. अनेक आयुष्य पाहिलेत त्याने, त्याला स्वातंत्र्य जगणारं कुणी हवंय.
ते, तू आहेस?
मी:  संसारात अडकले.
तो:  नाही. "स्वतःत" अडकलीस. माझा मक्ता घेतलास.
मी:  मी, मी नाही. तू आहेस. वास्तव्याला आलेला तू. विसरले होते. मी नाहीच, ह्याची जाणीव कधी निसटली?
तो:  विचार कर, डुबकी मार.
मी:  मी काल नव्हते, उद्या नसेन. तू लाख वर्षांपूर्वीचा, तू पुढे लाखो वर्षे राहशील. गहिरा होशील. लोकांच्या अर्थपूर्ण डोळ्यांतून दिसशील. तू उर्जा आहेस. नष्ट न होणारी. मी देह आहे, नाशवंत. तुला वाहून नेण्याचं माझं काम. पण तू ही इब्लिस, बंदिस्त होऊन स्वातंत्र्य शोधणारा.
(त्याच्या म्लान रुपाला तकाकी चढते)
एका शुन्य पोकळीकडून, दुसर्या पोकळीकडचा माझा प्रवास. दोन शुन्यात असणार तरी काय? त्याला आम्ही "मी" म्हणतो, नाव देतो, काही न काही मिळवत सुटतो, जे मिळवलं, ते दुसर्या शुन्यात शिरण्याआधी इथेच टाकतो. मिळवणं आणि गमावणं. ह्यातच सारं दवडलं. तुझ्या रुपी मिळालेल्या उर्जेचा किती हा अपव्यय? सतत काही न काही मिळवण्याचा अघोरी अट्टहास, इथेच सोडण्यासाठी. अलिकडे काही नव्हतं, पलिकडे काही नसणार. नुसता शुन्याचा लेप.
(त्याच्या चेहर्यावरच्या सुरकुत्या एकाएकी कमी होत जातात, मणक्यातून ताठ होऊन बसतो, तरुण हसतो)
हे घे. 'मी'पणाचा गणवेष. उतरवून दिला तुला.
येते....
तो:  आता काही दिवस इथेच राहीन म्हणतो...
(त्याचं मुक्त हास्य खोलीभर पसरतं)
ह्यावेळी निघून येताना, तो दरवाजा ओढून घेतलेला नाही. डोळ्यांतला अथांपणा गहिरा वाटतोय.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments