पर्वत

एकेकदा आपण असहाय्य उभे असतो
जडावल्या श्वासांचा भार फार होतो
जोडलेल्या हाताची आर्जवं मात्र
समोरच्यापर्यंत पोहोचतच नाहीत
तो उंचच उंच
त्याची मान ढगात
डोळ्यांत ढग शिरलेले
धूसर दिसतं
ते दाटून येत नाहीत
कोसळत नाहीत
मध्ये नुसतंच मळभ
आपल्या हाका
पोकळीतच विरतात
हळू हळू आपला पर्वत होऊ लागतो
न ढळणारा
न कळणारा
मग कधीतरी मेघ कोसळतो
आपल्यावर रिता होतो
आपल्या आत काही मुरत नाही
कातळ तेवढे लख्ख होतात

पर्वत करून गेलेल्या त्या क्षणाला सलाम..

-बागेश्री

Post a Comment

0 Comments