बेभान

झटकून टाक जीवावरल्या 
त्याच त्या श्वासांचा लेप
थांबव पापण्यांनी जमीन उकरणं
गुळमट भावनांच्या चिखलात
माखल्या हृदयाला
उचल, भिरकाव उंच
त्या उंचीवरून येईल लक्षात,
कितीतरी जगणं बाकी राहिलंय..

कितीतरी जगणं राहिलंय आणि
तेच ते वर्ख
पांघरुन
त्वचेला ओल आलीय,
पापुद्रे सुटले आहेत
ओशट त्वचेची कात टाक
कुठल्याही क्षणी 
नव्याने डाव मांडता येतो
तेव्हा
उचल हा क्षण चिमटीत
आणि
बेभान होऊन जगण्याला भीड...

भान ठेऊन जगणार्‍याचा, रस्ता फारसा योग्य असतो असं नाही


-बागेश्री

Post a Comment

0 Comments