टप्पा

आयुष्य कधी कधी
तुम्हाला अशा जागी आणून उभं करतं
जिथं तुमची प्रश्न
उत्तरांच्या
भींतीवर आदळून परततात
तुम्हालाच भिडतात
तुमच्यातच जिरतात..
मग आत उरतो कल्लोळ!
प्रश्नोत्तरांचा..
बाहेर तुम्ही अस्वस्थ असता
तुम्हाला झोप येत नाही
हसू उमलत नाही
तरी जाणता तुम्ही, की
कुठल्यातरी तोडग्यावर
येऊन हा कल्लोळ थांबणार आहे
बरे वाईट
योग्य अयोग्याचे
हिशोब मांडणार आहे
वाट बघणं हातात असतं
सारं कळून ह्या
प्रवासातून जाणं
अपरिहार्य असतं..
कुठल्याशा क्षणी
गुंता सुटतो
धागे मोकळे होतात
तुम्हाला ग्लानी येते
आणि तुम्ही
जगण्याचा एक टप्पा
ओलांडलेला असतो...!

पुन्हा कधीतरी.....
आयुष्य तुम्हाला....

-बागेश्री

Post a Comment

2 Comments