झाडाझडती

मला फार आवडतं
तुझ्या झाडाझडतीला सामोरं जायला..

तुझी जिज्ञासू नजर
जोखत राहते
मनाचा कानाकोपरा, भिंती..
तपासतोस माळे आणि
अडगळीतली ट्रंकही!
मनभर फिरून
कसून तपास करताना
सापडत जातात जागोजागी
तुला फक्त तुझ्या खुणा
तू मात्र पारखून घेतोस
धुळीत उमटून असलेला
पावलाचा ठसाही
त्यावर पाऊल ठेवून..

बघतोस
माझ्या मनभिंतीवर
ब्रशचे रंगीत फराटे
तू पेंटिंग करत असता
स्वतःच्या अंगाला पुसलेले
...मी इथे जपलेले

सापडतात तुला
तू फाडलेल्या
तुझ्या अपूर्ण कवितांचे
शब्द
चुरगळलेले
...मी कपट्यातून जपलेले

घेतोस सारं तपासून
तपासाचा सविस्तर
अहवाल लिहायला बसतोस
तेव्हा
फक्त तुझाच वावर
नमूद करावा लागतो तुला!
मला आवडतं त्याक्षणी आलेलं
तुझ्या ओठांवरलं हसू
कागदावर तू सही करतोस तेव्हा
तुला खात्री असते
ही सहीही जपली जाईल आणि
हा अहवालही बदलणार नाही
खरंच,
आवडतं मला
तुझ्या झाडाझडतीला सामोरं जायला...

येत जा,
किमान ह्या निमित्ताने भेट होते.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments