पाऊस दाटत नाही

ते तसं, आधीसारखं
तरल तरल
आता काही वाटत नाही
पाऊस मनात दाटत नाही
ओली फुंकर हिरवे रान
भटकून यावे होऊन बेभान
असं काही खुणावत नाही
जुनं स्वप्न भेटत नाही
नाचरा मोर, चांद चितचोर
जीवाला घोर होणं भावभोर
भुरळ कसली पडत नाही
भाव हळवा साठत नाही
संसारासाठी काडी काडी
बांधून काढावी नवी माडी
स्वतःपेक्षा मोठी इच्छा
आडवी पडून गाठत नाही
पाऊस मनात दाटत नाही

आता कसं सगळं निरभ्र
सुंदर नितळ स्वच्छ अभ्र
मळभ साचून रहात नाही
जातं कोसळून
दाटून रहात नाही
.... ते तसं आधीसारखं
तरल तरल
वाटत नाही
पाऊस काही
दाटत नाही
-बागेश्री

Post a Comment

0 Comments