कृष्णाचा सोपान

मी आज 'व्यक्तिमत्वाला फुलवणारा सोपान' लिहून झाल्यानंतर युगंधर कादंबरीत असलेला एक संदर्भ आठवला. तो असा:

कृष्णाने द्वारकेच्या महालात, त्याच्या वैयक्तिक कक्षाकडे जाणा-या वरच्या खोलीसाठी बांधकामाच्या वेळेस एक सोपान बनवून घेतला होता. जो मूळ रूपात केवळ एक सांगाडा होता
त्याला पाय-याच नव्हत्या.

त्याचं जगणं पुढे पुढे जाताना त्याने एक एक पायरी त्या सोपानावर चढवण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन पाय-या गोकुळातले नंद यशोदेच्या घेऊन तिसरी राधेला समर्पित होती. मग वसुदेव देवकी, रुक्मिणी, उद्धव, अर्जुन, द्रौपदी अशा पाय-या जोडत तो सोपान पूर्णत्वाला गेला. कृष्णाच्या जगण्यातल्या घटनाक्रमानुसार प्रत्येक पायरी सोपानावर बसवण्यात आली. सगळ्या पाय-या सुवर्णाच्या होत्या. मौल्यवान माणसांची आठवण मौल्यवान धातूत त्याने घडवली, त्याच्या प्रत्येक कृतीत काहीतरी संदेश आहे.

त्याच्या आयुष्यातल्या सोपानाचा हाच अर्थ असावा..
त्याची खोली, जिथे तो स्वतःला गवसत असतो, शांत एकांती, तिथवर पोहोचताना त्याला घडवलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीचं सातत्याने स्मरण व्हावं म्हणून त्याने ही उपाययोजना केली असावी, असं वाटलं

माझ्या सोपान चिंतनातून असा अर्थ लागत गेला, त्या कृष्णाच्या सोपानाचा!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments