प्रेमात पडल्यावर खरं सांगते

दावणीला काय आहे
उरलंय काय शिल्लक
असं सगळं बघायचं नसतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

आपल्याकडे लक्ष कुणाचं
बघतंय कोण एकटक
लोकांना दुर्लक्षाने, अंतरावर ठेवायचं असतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

नजर हरवून शुन्यामधे
बसायचं स्वतःशी हसत,
नाती गोती, दुनियादारी जाते आपोआप उडत
असू दे ना तुर्तास फक्त, स्वतःतच रमायचं असतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...

येईलच मग जाग कधी
झापड जरा सारल्यावर
वाटेल चुकलो मुकलो
भानावरती आल्यावर....
काहीही वाटलं तरी, स्वतःला 
दोषी कधी, ठरवायचं नसतं
प्रेमात पडल्यावर खरं सांगते
वेड्यासारखंच वागायचं असतं...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments