गंतव्य

गर्द अंधारात निमिषभर
वीज चमकून गेली आणि तेवढ्यात
खाली खोल उतरत जाणा-या पाय-या दिसल्या
सभोवताल पुन्हा मिट्ट काळोख..
अंदाजाने पहिली पायरी गाठली
उतरंडीच्या प्रवासाला
कठडा कुठे असतो?
एक एक पाऊल सावध टाकत
उतरत गेले
फार वापरातला नसावा हा रस्ता
कुठे कुठे शेवाळ
वाढलेलं गवतही
किर्रर्र काळोख
माझ्या श्वासाशिवाय कसला आवाज नाही
पाय-या संपत नव्हत्या
अंत कळत नव्हता
एका वळणानंतर
हलकासा उजेड दिसला
आणि आशा जिवंत झाली
उजेड वाढत गेला
लख्ख प्रकाशातलं
मोठ्ठ तळघर दिसलं
हा प्रकाश फार ओळखीचा
लिखाणाचे ढणाणते पलिते हे!
त्यांचाच लख्ख उजेड
मी माझ्यात खोल उतरून आलेय तर..
इथे अंधार नाही
कचरा नाही
निव्वळ शांतता आहे
परिसराला आत्ममग्न झळाळी आहे

मला माझ्या गंतव्याशी नेऊन सोडणा-या
त्या विजेचे किती आभार मानू?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments