बोचकं

कुणी बोचकं घेता का, बोचकं?
संवेदनशील मनाचं बोचकं
भावना, आसू,- हासू, हर्ष- वेदना, ओल्या संवेदना
ह्यांनी गच्च भरलेलं बोचकं?

घरात ह्याला जागा नाही
माळावरच्या पडीक किमती वस्तूत
असल्या बोचक्याला थारा नाही
घराला जड
जीवाला जड
ठेवायचं कुठे
टाकायचं कुठे
म्हणून बाहेर काढलंय
एखाद्याच्या घरात
एखाद्याच्या मनात
असेल ऐसपैस जागा
तर एक छोटं बोचकं
बसेल कुठल्या कोप-यात

जा कुणी
घेऊन जा
ओझं कुणी
उतरून न्या

सारं सरतेशेवटी इथेच टाकायचंय हो
डोळ्यासमोर आपली प्रॉपर्टी चांगल्या हाती पडलेली बरी..

बोला ना
घेतंय का कुणी, बोचकं

-बागेश्री

Post a Comment

0 Comments