कविता

पावसाळ्यातल्या कुठल्याशा रात्री
माझ्याच शब्दांची बिछायत करून
बिनघोर निजते स्वतःचं
ओलं सुकं मुटकुळं करून
होतो प्रवेश तेव्हा
कल्पनेच्या गहन नगरीत
राहते भटकत
उगाच मग मी
काही बाही आवरीत सावरीत
एकाएकी जेव्हा
येतो गारठा दाटून
तरलतेचं पांघरूण
घेते घट्टं ओढून....
सकाळी गरमा गरम चहाबरोबर
चाखत राहते
आदल्या रात्रीची स्वप्न!
.. होऊन आत्ममग्न
कातर धुकं
आसपास ठेवून
दिवस जातो सरत
भेगाळल्या तुकड्यांवर
हिरवा हात फिरवत..
उतरू लागते रात्र पुन्हा
दार खिडक्यांत थेंबातून
टपटपते होऊन शब्द
ओथंबल्या बोटांतून..
निथळते कागदावर
निळी जांभळी शाई
माझ्याकडे एक कविता
टक्क पाहत राही


-बागेश्री

Post a Comment

0 Comments