आम्हाला फक्त वाचायचं असतं!

तो म्हणाला मी माससाठी लिहीतो
ती म्हणाली मी क्लाससाठी लिहीते
ते म्हणाले...
पण आम्हाला फक्त वाचायचं असतं
हळू हळू कुठेतरी साचायचं असतं
नसतो आम्ही कुठल्याच वर्गीकरणात
आम्हाला आमचंच मन वाचायचं असतं
फाटक्या नात्यांना टाचायचं असतं
पोहोचवतो आम्ही आमची भावना
घेऊन तुमचे शब्द उधार
तुटणारं काही येतं जुळून
बुडत्याल्या होतो काडीचा आधार
बुडता बुडता तगायचं असतं
शब्दांना तुमच्या जागायचं असतं
जोडून घेतो नाळ आमची
रंगतो तुमच्या रंगात
भाव आमचा, तुमचे शब्द
गातो आमच्या ढंगात
लागेल त्या सुरात गायचं असतं
रंगात दंग व्हायचं असतं
अहो,
आम्हाला फक्त,
फक्त वाचायचं असतं
हळू हळू कुठेतरी .... साचायचं असतं

-बागेश्री

Post a Comment

0 Comments