गच्ची


गच्ची!
हा जगण्यातला एक अद्भभूत, अविभाज्य घटक होता, ही तेव्हाची गोष्ट!

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की तिचं महत्त्व जरा जास्तच जाणवू लागायचं. सुट्या आवडण्यामागे तिचा नकळतच मोठा वाटा होता. आई - आजी- काकू - मामींना वाळवणीचे पदार्थ करण्याची आवर्जून लहर यायची, मग अगदी बटाट्याच्या वेफर्सपासून, कुरडई, खारोड्या, साबुदाण्याचे पापड, उडदीचे पापड अशा अनेक प्रकारासाठी गच्ची खुली व्हायची.. आणि पदार्थ राखायला आम्हा कच्चे- बच्च्यांची नेमणूक व्हायची. 'तळे राखी तो पाणी चाखीच' ह्या वैश्विक नियमानुसार वाळवणीवर टाकलेली साडी एकसारखी करण्याच्या निमित्ताने कच्चे वेफर्स, खारोड्या गट्ट्म करण्याची आणि खाली उतरून आल्यावर एकमेकांची कागाळी करण्याची संधी कोणी म्हणून हुकवायचा नाही. पुढचे ४-५ दिवस पदार्थ कडकडीत वाळेस्तोवर ही सगळी धमाल चालायची. याशिवाय, आपल्याघरी हे पदार्थ करताना एखादी शेजारीण मदतीसाठी आवर्जून असायची, मग तिच्याकडे पदार्थ करण्याच्या निमित्ताने पुन्हा आमची वरात तिकडेही लुडबूड करायला हजर असायची, ते असे दिवस होते जिथे आसपासचीही घरं आपल्याच मालकीची ह्या अविर्भावात फिरण्यात काही वावगं वाटत नसे. त्याचबरोबर शेजार्‍यांकडे आलेले पाहुणेही आपल्याघरी पडीक असण्याची मुभा होती. सगळं "आपलं" ह्या वर्गवारीत मोडायचं. त्यामुळे अंगणं मोठी वाटायची. मोकळ्या माणसांच्या मोकळ्या मनाइतकी मोठी. कुठेही उंडारता यायचं, हक्काने रागे भरणारी, कौतुकाने जवळ घेऊन खाऊ- पिऊ घालणारी मंडळी सगळी...              
                      कडकडीत उन्हाचा दिवस मागे सारल्यानंतर, दिवसभर डेजर्ट कुलरची भरपूर कवायत झालेली असायची. त्याला आराम देण्याचा सुज्ञ विचार करत आजीबाईंच फर्मान सुटायचं "जा रे, वर गच्चीत पाणी घाला, रात्री झोपायला वर जायचंय, आतापासून पाणी घातलं म्हणजे गार होती गच्ची, जाताना वळकट्या न्या, जिन्यातल्या चौकात नेऊन ठेवा सध्या, कासवछाप आणलंय का?" झालं.... आमची टाळकी ह्या फर्मानाची वाट्च बघत असायची आणि बादल्या, तांब्या घेऊन गच्चीवर हजर! सिंटेक्सच्या टाकीतून पाणी उपसून इवल्या जीवांची गच्ची गार करण्याची धडपड मोठी गंमतशीर असायची "अरे कसल्या वाफा येतात बघ, पाणी ओतलं की" म्हणत आमचा उद्योग आजी गच्चीवर येऊन "पुरे मेल्यांनो, संपवणार का सगळं पाणी?" म्हणत दरडावत नाही तोवर अथक चालायचा.
                      आम्हाला रात्रीचं जेवणंही गच्चीवर लागायचं. उकड- शेंगोळे, वरणफळ, थालीपीठ, घट्ट वरण, ज्वारीची भाकरी, बुक्की मारून फोडलेला कांदा आणि वाळवणातलं ताजं काही तळलेलं असा तो उन्हाळ्यातला फर्मास बेत असायचा. दूपारी ताव मारून उरवलेला आमरस गच्चीवर एका ताटलीत, भरपूर तूप चोपडून "आमरसपोळी" होण्यासाठी ठेवलेला असायचा, त्या पोळीचा फडशा पाडताना उगाच केलेली हमरा-तुमरी म्हणजे आजीला आमच्यावर ओरड्ण्याची दिलेली अजून एक संधी. आजीने गच्चीवर पाण्यात वाळं घातलेला माठ ठेवलेला असायचा, आज ना कुठल्या गार पाण्याला त्याची चव आहे ना अत्युच्च्य कोल्डड्रिंक्सना ....
                   रात्री आजी बाजेवर आणि आम्ही भावंड सतरंजी, त्यावर गालिचे आणि शुभ्र चादरी घालून निजायचो. स्वच्छ आकाशातल्या लाख चांदण्या बघता- बघता झोप लागायची. रात्री कधीही जाग येई तेव्हा वर चांदण्यांची जाळी दिसायची आणि गार वार्‍याच्या झुळका येत असायच्या. थंड अंथरूणाचा स्पर्श लोभस वाटायचा. पहाटे पहाटे गारठा वाढून सोलापूरी चादर अंगभर ओढून गुडूप होण्याची आठवण म्हणजे बालपणीच्या काळावरली स्निग्ध साय! 
              
                हिवाळ्यात ह्याच गच्चीला वेगळं रूप यायचं. परि़क्षेचे दिवस जवळ आलेले असायचे. रात्रभर गारठलेलं अंग सकाळच्या उनउन उन्हात जमेल तसं शेकून काढायचं. गोधड्यांनाही उन दाखवायचं. आजीची बाज अभ्यासाच्या पसार्‍याने भरून जायची. आईच्या हातची कढी भुरके मारून पिताना अभ्यासातल्या गोष्टीही पोटातून मेंदूकडे सरकत असाव्यात.. उन वाढलं की परतून खाली जायचं. हिवाळातल्या उन्हाची तकाकी विलक्षण, डोळ्यासमोरची अंधारी सरायला बराच वेळ जायचा...
              वय वाढत गेलं, तसं गच्चीशी नातं दृढ झालं. मनाला एकांत हवा तेव्हा तेव्हा ती हक्काची जागा झाली. हळूहळू वॉकमन्स आले. आवडत्या गाण्यांची कॅसेट घेऊन गच्चीवर जायचं आणि तास न् तास तिथे एकट्याने रेंगाळून काढयचे. आवडीचं एखादं पुस्तक घेऊन जायचं आणि बाजेवर निवांत पडून वाचत रहायचं. अंधार पडू लागे तसा ८० चा भक्क बल्ब लावून पुस्तक वाचणं सुरूच राही... एखाद्या पानावरची एखादी ओळ, त्या पुस्तकात खेचून नेई तेव्हा, पुस्तक मिटून आकाशाकडे टक लाऊन त्या ओळींत, त्याच्या आशयात डुंबत राहण्याचा छंद जडला, तो तिथेच!
      ......वाढत्या वयाने मजा- मस्करी मागे सारली आणि गच्चीशी असलेलं नातं समंजस होऊ लागलं! 
                        पावसाळ्याच्या तोंडाशी दूपार टळून गेल्यावर, हवेत मळभमिश्रीत गारवा जाणवायचा. हवेतला ओलसर गारवा ओढणीतून, केसांच्या बटांतून आरपार व्हायचा आणि गरमागरम वाफेचा चहाचा कप हातात असावा वाटू लागायचं.. गच्ची साद घालायची! तत्परतेने चहाचं आधण ठेवून त्यात पद्धतशीर अद्रक, गवतीचहा टाकून उकळायला ठेवायचा.  चहाला उकळी येईपर्यंत पटकन वर जाऊन गच्चीच्या दरवाजाला गोदरेज कुलूपाच्या विळख्यातून सोडवायचं आणि गच्चीचं दार सताड उघडायचं, वार्‍याला आलेलं उधाण दार आदळण्याच्या तयारीत असायचं तेव्हा, दोन वीटा आणून उघड्या दाराच्या पायाशी आणून ठेवायच्या आणि चहाची आठवण होऊन पुन्हा खाली धाव घ्यायची.... 
               हातात कप घेऊन, गच्चीवर जायचं आणि गरम चहाची वाफ अन् हवेतला ओलसर गारवा एकत्रच श्वासातून आत ओढून घ्यायचा. आकाशात ढगांची सजणारी चळत पहात निवांत व्हायचं... मनात साठवलेलं खूप काही हळूवार आसपास पसरू द्यायचं.. गच्चीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या चकरेत सबंध भूतकाळाची वारी व्हायची आणि आकाशातला काळा विठोबा प्रसन्न होण्याच्या तयारीत असायचा....
पावसाची टपटप समजून उमजून आतवर जिरवायची... आयुष्याची माती घट्ट मुट्ट करून घ्यायची.
पुन्हा पावसाळा आला आहे.. मात्र फ्लॅट सिस्टीमच्या संस्कृतीत हक्काची गच्ची हरवलीय..
                   हातात चहाचा कप, सोबतीला आवडती गाणी आणि पावसाची टपटप अनुभवायला मनातली गच्ची मात्र साद घालतेय...
-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. विश्वास बापट नामक गृहस्थाने आपला हा लेख जसाच्या तसा त्याच्या गेसबुक वॉल व पोष्ट केला अहे , आपला, आपल्या ब्लॉग चा कोणताही उल्लेख नकरता . ही एक चोरी आहे . मी त्या बापटा6ना त्या6चा वॉल वर लिहीण समज दिली आहे आपण स्वत: लेखक असल्याने त्यांना कायद्याच्या भाषेत समज द्या त्या शिवाय हे असले चोर ताळ्याव्र येणार नाहीत.

    हे ते विश्वास बापट

    https://www.facebook.com/profile.php?id=100009732789392&hc_ref=NEWSFEED&fref=nf

    ReplyDelete