तू नसल्यावर

कैक सुरकुत्या
आकांक्षांवर
मनात
विझलेले कोलाहल
तुळशीपाशी
मिणमिण पणती
जळती विझती
तरीही तगती
तुझ्याचसाठी असेल तेवत
तुझ्या आठवणींच्या सोबत

डोळ्यात उभ्या
आयुष्याच्या
वय सरलेले
दिसेल केवळ
हिशोब सारे
संसाराचे
भासू लागतील
उगाच पोकळ
साय दाटली
एकांताची
गूज मनीचे बसेल सांगत
तुझ्या आठवणींच्या सोबत

सुन्न घराचा
एकल वासा
तुझ्याच चेह-याच्या
भासाचा
तुझीच वचने
तुझाच जागर
उरेल व्यापून
तेव्हा घरभर
छातीमधली
अनाम घरघर
फक्त एकटी असेल जागत
तुझ्या आठवणींच्या सोबत
                   -बागेश्री

Post a Comment

2 Comments

 1. एक आहे एकटेपण, पण संवेदन मात्र 'तुझे' म्हणजे 'तुझ्या आठवणी सोबत'आहे... आठवणीची दाहकता व्यक्त झाली आहे....आकांक्षाच्या 'सुरकुत्या' झाल्या आहेत,ह्या मध्ये.पण त्यांचे उदात्तीकरण झाले आहे."तुळशीपाशी"मध्ये. "मिणमिण पणती,जळती विझती,तरी तगती"..."वय सरलेले" आहे,आणि "हिशोब सारे संसाराचे"
  ह्या ओळींतून संसाराची असारता व्यक्त झाली आहे.पण त्यातून "एकांताची साय दाटली" आहे. नैराश्य आलेलं नाही, पण विफलता जाणवली आहे. त्यामुळे एकांताचे सुख व्यक्त झाले आहे "दुधावरच्या सायीसारखी...गुज मनीचे सांगत" ह्या एकांताचे सुख, गूज होऊन गेले आहे, दुधावरची साय झाले आहे, दही नाही..(दही हे दुध नासण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे).आणि अखेर... एकांतामुळे "सुन्न घराचा,एकल वासा" होऊन "तुझ्याच चेह-याच्या भासाचा" जागर होत आहे.
  ही कविता दोन स्तरांवर आंदोलित झालेली आहे.पहिल्या कडव्यात:आकांक्षा हे स्थूल gross रूप आहे; तर आठवणी हे सूक्ष्म subtle रूप आहे.त्याचप्रमाणे,दुस-या कडव्यात, संसार हे स्थूल रूप आहे, तर एकांताची दाटलेली साय हे सूक्ष्म रूप आहे. तर शेवटच्या कडव्यातील सुन्न घराचा एकल वासा हे स्थूल रूप आहे, तर अनाम घरघर हे सूक्ष्म रुप आहे.
  बागेश्रीच्या मनातील द्वंद्व हे तिच्या आध्यात्मिक चिंतनाचे सार आहे आणि ते ह्या च नव्हे तर तिच्या अनेक कवितांचे वैशिष्ट्य आहे.खूप छान जमले आहे, हे सारे...हे जसजसे इतर सोपान पार करत जाईल तसे ह्या कवयित्रीचे चिंतन अद्वैतात उतरू शकेल.कारण अद्वैताकडे नेणारा प्रवास द्वैतातूनच जातो.

  ReplyDelete
 2. कारण अद्वैताकडे नेणारा प्रवास द्वैतातूनच जातो. >>> Absolutely yes :)

  ReplyDelete