मीच माझी पालक

माझ्या हाती मी लागले आणि मग संस्कार घडवायचे ठरलं. ठरलं की मीच माझं मुल होईन आणि पालकही. मग स्वतःला बरीच पुस्तकं भेट दिली, चांगली गाणी ऐकवली. म्युजीकने मन रमतं म्हटल्यावर गाडीत ऐकायला अशा सीडी दिल्या ज्याने प्रवासातला वेळ सत्कारणी लागेल. विविध लेखकांची पुस्तकं ह्यासाठी की आतली समृद्धी वाढत राहावी. माझे हट्ट लक्षात आले, खट्याळपणाही. नमतं घेण्याची वृत्ती दिसली आणि कुठे वरचढपणाही. ते सगळं सांभाळत आकार देणं सुरु झालं आणि लक्षात आलं ही एक नेव्हर इंडिग प्रोसेस आहे. स्वतःची स्वत:ने उचललेली जबाबदारी आहे. एखादी चूक आणि स्वतःचं नुकसान. असं थेट गणित त्यामुळे फार जपून सारासार विचार करत करावं लागतं सगळं.
        सध्या ज्यांच्या लेखी तिचं महत्व शून्य आहे अशा लोकांसोबत जुळवून घेण्याचा तिचा संयम संपत चालला आहे, अशी लोकं समोर आली की ती करवादते, तिचा मी जुळवून आणलेला साधनेचा सारा डोलारा डगमगतो. अशावेळी शिताफीने मी तिच्यासमोर चित्रकलेची वही किंवा लॅपटॉप धरते, काहीतरी नवं घडवण्यात ती मग्न होते. अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जी चांगल्या कामासाठी वापरणं चाललंय. सध्या विजय तेंडुलकर अभ्यासते आहे. सातत्याने तिला खाद्य पुरवत राहणं, समृद्ध करत राहणं हे व्रत आहे आणि मी व्रतस्थ आहे.

बाकी, माझं बोट पकडून डौलात निघाली की आनंद वाटतो, हे खरं

-बागेश्री

Post a Comment

2 Comments

  1. मीच माझी पालक....एव्हढेच नव्हे तर मालकही....ही सत्य आहे...ते अनेकदा झाकोळल गेलं तरी हे ऋत आहे....त्रिकालाबाधित सत्य आहे....त्याचे बोट धरून बागेश्री जी वाटचाल करते आहे...हे एक मननीय चिंतन आहे.साधना म्हणजे वाचन-मनन-चिंतन, शब्द सामर्थ्य, शब्दकळा, भावनांचा परिपोष-परितोष, अभिव्यक्तीची परिपक्वता इ.अनेक साहित्य समीक्षेच्या कसोट्यांना उतरणे....सकारात्मक उर्जा अशा साधनेत येत असते; पण त्याचवेळी आपली बलस्थाने आणि कमकुवत स्थाने सततच्या आत्म परिक्षणातून जाणून घेणे, आवश्यक असते...बलस्थान हे अहंकार प्रेरित आणि प्रभावित नाही ना, ह्यांचा सदैव धांडोळा घेणे. कमकुवत स्थान डोईजड होणार नाहीत आणि ती विस्तारणार नाहीत, त्यांचे उगाच लाड केले जाणार नाहीत,ह्यांचाही सतत मागोवा घेत रहावे लागते.अशी विधायक-सम्यक बागेश्री घडत जात आहे....त्याचे अवलोकन ती स्वत:च एका 'मी' मध्ये बसून करते आहे,ही भूमिका नाविन्यपूर्ण आहे, आणि लोभस आहे.

    ReplyDelete
  2. बलस्थान हे अहंकार प्रेरित आणि प्रभावित नाही ना>> He atyant mahatvacha. अहंकारासम खट्याळ कुणी नाही. आपली वरात काढून कट्ट्यावर पाय सोडून मजा बघत बसणारा प्राणी हा

    ReplyDelete