राधे!

राधे
तू कुठल्या हिशोबाने
टाकलं होतंस गहाण स्वतःला
आणि पांघरलं होतंस
कान्हयाचं गारुड
जायचीस धावत
त्याच्या बासरीमागे
तुझ्या पावलांना
संसाराची धूळ
होती राधे
आणि पैंजण
साक्ष देत राहिलं
उभ्या गोकुळाला

कुणी रस्त्यावर येऊन
कुणी दाराआडून
कुणी गवाक्षातून
पाहत राहिलंय
तुझं वेड
आणि हसले आहेत तुला
भरल्या संसारात
सुचलेल्या अवदसेमुळे
राधे,
पण तू बरं केलंस
बरं केलंस की
दिली नाहीस स्पष्टीकरणे
परिस्थितीची कारणे
रत राहिलीस
तुला गवसल्या
तुझ्या प्रेमात
तशीही कशी कळणार होती
तुझी भाषा त्यांना??
त्यांच्याकडे स्वत्व होतं
तुझ्याकडे कान्हा!
तुझ्या अबोल समृद्धीचीच
आज पूजा होते
श्यामाआधी जग
तुझे नाव घेते

-बागेश्री

Post a Comment

0 Comments