लेक सवंगडी

              तू तारुण्य उतरवून सुरकुत्यांचा साज चढवलास तोवर घरातल्या लेकी- बाळी जाणत्या झाल्या होत्या. तुझ्या कष्टांची जाणीव असलेल्या त्या प्रसंगी घरातल्या पुरुष मंडळींसमोर तुझी बाजू उचलून धरू लागल्या. तुलाही हक्काचे सवंगडी मिळाल्यासारखं झालं. आता मनाला न पटणारं, खटकणारं तू बेधडक बोलू लागलीस. उभं आयुष्य ह्या घराला दिल्याने तसाही तो हक्क  तुझ्याकडे आपसूकच आला होता. म्हणायला गेलं तर तुझ्याही स्वभावाचे अनेक कंगोरे वयानुसार बोथट झाले होते. न रुचणारं बोलून दाखवताना कमालीचा संयम आला होता. आतातर मुलींच्या आग्रहाखातर साडी ते पंजाबी ड्रेस असा पल्लाही गाठला होतास. थोडक्यात काय तर बंधनांचं धुकं बऱ्यापैकी निवळलं होतं...
            तू मोकळी होत होतीस...

आणि लेकीचं लग्न ठरलं 
       -तुझ्यामागे तुझ्याच शब्दातली सतराशे साठ कामे लागली. सोळाव्या वर्षीसारखा उत्साह ओतून कामाला लागलीस. लेकीला आवडीने सजवू लागलीस. तिच्या साड्या दागिने, ड्रेस, मेकअपचं  साहित्य, रुखवत, आहेर  एक म्हणता हजार कामे. तुझी राहून गेलेली हौस तिच्या रूपाने साकारू लागलीस. लेक मात्र संसार स्वप्नात रममाण. तिच्या कानाचा मोबाईल काही सुटेना तेव्हा जराशी हिरमुसलीस. तुझा सवंगडी पुन्हा तुझ्यावरच राज्य टाकून आता जाणार होता. तुला तिला थांबवता येईना, जाऊ द्यावेसेही वाटेना. पण तिच्या डोळ्यांतली स्वप्ने पाहता तुला नव्याने हुरूप आला. तिच्या स्वप्नासाठी तू आजवर काय केलं नव्हतंस? नातलगांना हाताशी घेऊन घरातलं- बाहेरचं  सारं  सांभाळू लागलीस. आता तुला उसंत नव्हती. 

       घरातल्या लहान- मोठ्या, अगदी लग्नाच्या हॉलपासून ते लेकीच्या मुंडावळीच्या डिझाईनपर्यंत गोष्टी तुझ्याच सल्ल्याने केल्या जाऊ लागल्या, आणि तुला जाणवू लागलं घरातलं तुझं  महत्त्वाचं स्थान... तुझ्या त्यागाने, कष्टाने तुला बहाल झालेलं अमूल्य स्थान. पत्रिका छापून आल्या. आमंत्रणे झाली. खरेदीला जोर चढला. कपडे शिवायला गेले. स्वयंपाकी ठरले. जात्यावर गहू भरडले गेले, मुहूर्त झाला. चटण्या, चिवडे, फराळाचं  साहित्य, घरात घमघमाट उठला. सगळीकडे जातीने तूच हजर. अगदी दाराबाहेरच्या भिंतींवर सनई- चौघडा चितारताना पिवळा आणि लाल रंग त्यात आलाच पाहिजे असं ठासून सांगायलाही तूच उभी.  
          बघता बघता लग्नाचा दिवस आठवड्यावर आला. दारी मंडप पडला. मंडपाच्या खांबांना हळकुंडे बांधली गेली. घरात हळवं वारं  वाहू लागलं. बाप शांत शांत राहू लागला. लेक येऊन जवळ बसली तरी त्याचे डोळे भरून येऊ लागले. तू अबोलपणे त्या भावनांची साक्षी झालीस. लेकीचे लाड वाढले. रोज तिच्या आवडीचा एक पदार्थ बनू लागला. दूरचा एक-एक नातेवाईक आता मुक्कामी येऊ लागला. तशी तुझी लगबग वाढली. पाहुणे जमू लागले तसे मान- पानही वाढले. सा-यांची मने राखत चौफेर भान ठेवून तू वावरू लागलीस. तुझ्यावरली जबाबदारी, ताण आता चेह-यावर स्पष्ट दिसू लागला. लेकीनं अट्टाहासाने तुला फेशिअल करायला लावलं, तेवढेच ३ तास तिने तुला घराच्या रगाड्याबाहेर काढलं. माय- लेकीच्या काळजाच्या काळजाशी गप्पा झाल्या. तेवढ्यानेही तुला संजीवनी मिळाली. आता लग्न पार पडेपर्यंत तू थांबणार नव्हतीस......

                            कन्यादान...
तुझ्या कुशीला बोट लावून लेकीच्या कुशीला लावलंस, माझ्यासारखीच तिची कूस उजू दे म्हणालीस. अर्थात हे सारे विधी. त्यात शास्त्र किती, तथ्य काय ह्या पेचात तू कधीच पडली नाहीस. पण प्रत्येक गोष्ट श्रद्धेने करणारी तू अशा विधींच्या वेळी गहिवरून गेलीस. हळव्या बापाला उगाच थोपटत राहिलीस. सारे विधी पार पाडून नवदाम्पत्य लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी डौलाने उभे राहिले तेव्हा स्टेजकडे अविचल नजरेने पाहत होतीस.... काय दिसलं नसेल तेव्हा तुला? लेकीचं बालपण, तिचे यशापयश, रुसवे- फुगवे, तिने तुझी आई होणं, सवंगडी होणं, अगदी कालपर्यंत तुला घट्ट बिलगून झोपणारं ते पाखरू आता झेपावायला सज्ज झालेलं......

               लग्न उत्तम झालं, अशी पावती सगळयांकडून मिळत असताना, तुझ्या सुरकुत्यांतली थरथर मात्र शमली नव्हती.  लेकीकडे तृप्त नजरेने पाहताना, अंगावर रुबाबदार पैठणी, चार दागिने घातलेली तू श्रांत दिसू लागलीस. लेकीने स्टेजवरून तुझ्याकडे पहात "सुंदर दिसतेस, आई!" अशी खूण करताच तुझ्या गालांवर नकळत हसू उमटलं. 

              आयुष्यभराचे कष्ट, त्रास सनई चौघड्याच्या निनादात विरत - विरत गेले... तुझ्या मनभर समाधान पसरलं. समाधानी चेह-यामुळे तुझ्या रूपात आणखीच भर पडली.......  

-बागेश्री

Post a Comment

0 Comments