हा क्षण जादुई आहे

हा क्षण जादुई आहे
इथे फक्त मी आहे
ओघळतेय इथे लख्ख दुपार पानापानातून
वाहत्या पाण्यावर आणि
जातेय वाट फुटेल तिकडे पसरत..
माझ्या अवती भोवती गळून पडलेत
कालचे वाळलेले क्षण
कुरबुरु लागलेत पायाखाली
आणि इथेच, इथेच
एखाद्या जुन्या पुराण्या खोडाला
बिलगतंय एक नवं कोवळं आयुष्य..
उंच झाडाच्या पलीकडून
आकाशाचा एखादाच तुकडा
निरखतोय सारं
शुभ्र डोळ्यांनी
फक्त त्याने टिपलेत
ह्या क्षणाला फुटलेले धुमारे

मला कळेना
मी तो वाळलेला क्षण आहे
की आकाशाचा तुकडा
उद्याची वेडी धुमार
की पसरणारी दुपार..
खरंतर
हा क्षणच जादुई आहे
आणि इथे फक्त मी....
.....फक्त मी आहे

-बागेश्री

Post a Comment

0 Comments