उतराई

तू लोणी खायला यावंसं म्हणून मी
मडकी खूप खाली बांधायचे कान्हा
पण माझ्या घरावरून निघून जाताना, तू फक्त खुणेचे वेणूस्वर आळवायचास
आणि मी
मोहराने डवरलेल्या आम्रवनात हजर व्ह्यायचे!
एकदा ठणकावून, 'का येत नाहीस' विचारता
जीवघेणं हसत म्हणालास,
'राधे, तो आनंद गोपिकांनी घ्यायचा'
त्या भेटीत तुझी वेणू गंभीर का होत गेली, मला कळलंच नाही कान्हा..

.....आणि दुस-या दिवशी घरावरून न जाता, तू आत येऊन
मडकी फोडून, लाडक्या लोण्यावर ताव मारलास
तेव्हा तुझ्या पुढ्यात येऊन बसलेल्या ह्या राधेला, ओळखही दिली नाहीस !
मी करून पाहिली तुलना, तुझ्या ह्या मग्न रूपाची
कुंजविहारात, यमुनेशी, वेणूत रमलेल्या माझ्या कान्हयाशी..
 तू  नेहमीच स्वतःत रमताना
माझं अस्तित्व, तुझ्यात शोषून घेतलं आहेस, कान्हा
पण इथे आत्ता, माझ्या पुढ्यातला तू , परका वाटलास आणि लागला अर्थ तुझ्या बोलण्याचा
"राधे, राधे हा आनंद गोपिकांकरता...  तुझ्यासाठीचा मी, वेगळा फार वेगळा आहे"
पण
झाल्या चुकीची सोपी शिक्षा देईल, तो कान्हा कसला आणि
मूकपणे न सोसेल, ती राधा कसली
तू फिरकलाच नाहीस...

तू फिरकलाच नाहीस, कित्येक काळ
मी मात्र ठरलेल्या वेळी, ठरल्या जागी, नेमाने हजेरी लावीत गेले कान्हा
आम्रमोहोर उतरला
पैंजण थकलं
निरोपाला एकच उत्तर
"कन्हैया लोणी खाण्यात मग्न आहे.."
आपली हक्काची वेळ, अशी गोपिकेत वाटली गेली.... आणि
त्यादिवशी
त्यादिवशी बांध फुटला कान्हा
आणि पैंजण बिनघोर निनादत राहिलं,
कुंजवनाने झेलला पदन्यास
अस्वस्थ वारा घोंगावत राहिला...
मी कोसळताना
शांत झाला परिसर

..... बटांना डोळ्यावरुन दूर करताना
तुझ्या स्पर्शानेच
जाग येत गेली तेव्हा,
तुझ्या हळव्या नजरेत व्यापून असलेल्या त्या प्रेमाची मी कशी उतराई होऊ कान्हा...
कशी उतराई होऊ!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments