नितळ

एखादा माणूस खूप
नितळ वाटला तरी
आत एक गढूळ कोपरा असतोच
तो हुशारीने दाखवत राहतो
फक्त नितळ परिसर..
तुमच्या डोळ्यांची सूर्यकिरण
तळाला भिडून परतत राहतात!
आणि कुणीतरी हक्काचं मिळालं
अपार नितळ मिळालं
म्हणून तुम्ही आयुष्याचा सोहळा
साजरा करू लागता

....आणि कधीतरी,
कसातरी
गढूळ कोपरा उघडकीस येतो
पाहता पाहता
ढवळून निघतो
गढूळ करतो
सारा नितळ परिसर..

डोळ्यातली किरणं लोपतात
सोहळे निपचित होतात
एक गढूळ कोपरा
फक्त एक, गढूळ कोपरा
... सगळी नितळता क्षणांत पिऊन टाकतो!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments