कातरवेळी

कातरेवेळी,
आठवणीचा झुंजूमुंजू
पाऊस मनात उतरतो..
आणि उन्हाची काहिली
कुठल्या कुठे पळून जाते

मनाची भेगाळली भुई,
एकसंध होत
हलकासा मृदंगध पसरू लागतो
आणि झिम्माड वारा
घेऊन उडतो
विस्मरणाचा पालापाचोळा!

उंबऱ्यात आई दिसते, कुठूनतरी दादा धावत येऊन खोडी काढतो. ताईची चढ्या आवाजात कागाळी आणि
पुढच्याच क्षणी उन्हाळयातले पदार्थ चाखण्यावरून
हमरी तुमरी! दमलेले बाबा घरी परततात आणि
मुलांच्या दंग्यात सामील होतात...
दूर कुठेतरी रेडिओ गुणगुणत असतो
आणि आजीची सांजवात 'शुभं करोति' गाते.. सारे देवघराशी जमू लागतात...
म्हातारीची तीक्ष्ण नजर जशी सगळीकडे तशी खिडकीबाहेरही जाते...
"अगं सुनबाई, लक्ष आहे का?
कपडे ओले होतील हो, वाळवणही उतरवा..
मेला, वळीव आला वळीव!"

अगदी तसाच,
कातरेवेळी,
आठवणीचा पाऊस मनात उतरतो...

उन्हाची काहिली कुठल्या कुठे पळून जाते

-बागेश्री

Post a Comment

0 Comments