बहुरुपियाँ

.... कुठल्याशा क्षुल्लक कारणावरून
तू रूसावंस आणि मी तुला
छातीशी घट्ट धरावं
असं किती वेळेस झालं आहे, कान्हा?
तू मात्र माझ्यापासून दूर होत
निरागस डोळ्यांनी एकटक पाहू लागतोस..
तेव्हा मला लहान, अजूनच लहान वाटू लागतोस!
तूही एकाएकी
रांगू लागतोस माझ्या भोवताली
तुला कडेवर उचलून घेण्याचा मोह 
अनिवार होतो राजसा..
आणि तेवढ्यातच तू
तुझ्याच खोड्यांनी त्रासलेल्या गोपीकांच्या
नकला उतरवून दाखवणारा
नकलाकार होतोस..
हसू लागतो आपण दोघेही, बेभान होऊन!
तेव्हा विजेच्या चपळाईने अचानकच उठून 
तू धावू लागतोस,
म्हणतोस..
"धाव राधे, पकड मला"
मघाचा खोडकरपणा,
त्याआधीची निरागसता,
कशी कुठे लुप्त होते मोहना?
आणि कुठून येते अचानक
आवाजात हे आवाहन?
तू धावत राहतोस
तुला प्रत्येक खळगा पाठ
मी करते लाख प्रयत्न
तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा
तू न थकता, न थांबता विचारतोस
"दमलीस राधे, दमलीस का तू?
ये ना.. धर हा हात..."
मीही इर्षेने
त्वेषाने
माझा पायघोळ परकर सावरत
पोहोचू पाहते तुझ्यापर्यंत
माझा हात
तुझ्या खांद्याजवळ येताच
तुझ्या सर्वदिशेने हाका येऊ लागतात कान्हा
"ये राधे... धाव, पकड मला"
लक्ष लक्ष रूपांनी
तू माझ्या भोवताली
धावू लागतोस आणि माझी गती सरते,
धाव थांबते
श्वास मात्र धपापत राहतो....
तुलाच असह्य होते
माझी अवस्था आणि
हळूवार हातांंनी एखाद्या प्रौढासारखा
मला थोपटत राहतोस
काळ्याशार डोळ्यात
गहिरं ममत्व घेऊन...

क्षणभरात मला अनेक नात्यांनी भेटून जातोस, कान्हा
लाख रूपांतून भुलवीत राहतोस...
तुला युगानुयुगे जाणत असनूही
मी मात्र गुरफटते तुझ्या
मोरपंखी चकव्यात...
आणि शोधत राहते तुझंच बोट,
..बाहेर पडण्यासाठी!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments