सरोवर

स्वतःच्या अस्तित्वाच्या
सरोवरात डुंबत रहावं तास न् तास
नि कधीतरी बाहेर पडावं
अनुभूतीची ओल
गच्च अंगावर घेऊन...
बसून रहावं शांत
वास्तवाचा करकरीत सूर्य
अंगावर घेत,
निथळू द्यावा
थेंब न् थेंब
स्तब्ध परिसरात..

काही वेळाने
पहावं वाकून
स्वतःचंच रूप
स्वतःच्या सरोवरात..
दोन डोळ्यांची
लख्ख तकाकी
निरखत राहील
एक नितळ तळ!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. अस्तित्व हा एकान्त आहे. तिथे फक्त शुद्ध जाणिवेचा मी असतो. ह्या मी ला मी-पणा नसतो. त्यामुळे त्याला अनुभूतींचा भावगर्भ ओलावा असतो. जीवन संगीताचे सूर इथे अनाहत नादरुपात ऐकू येतात.
    पण जेव्हा वास्तवाच्या प्रांगणात मी येतो, तेव्हा असते, सूर्याची धग... जगण्याचा आकांत मला ऐकू येऊ लागतो. कारण वास्तवाच्या उन्हात फक्त मी नसतो, माझेपण मला घट्ट चिकटून येत असतं.
    अस्तित्वातच्या पाऊल खुणा "निथळत" जातात. माझे ओलेपण सूर्याला पेलवत नाही. वास्तवाला भावनामय क्षमता नसणे हा शाप आहे. म्हणून मी अस्तित्वाला पाकीट बंद करून खिशात ठेवतो. कारण मला अस्तित्वही जपायचं आहे.
    पण जेव्हा भवताल सुद्धा नि:स्तब्ध होतो, तेव्हा अस्तित्व वास्तवाला आपल्या कवेत घेते..... अस्तित्वाचे हुंकार आणि ओंकार जेव्हा ऐकू लागते, तेव्हा बागेश्री पाहते " वाकून, स्वत:चंच रूप, स्वत:च्या सरोवरात ......” हा आहे अस्तित्वाचा विशाल नितळ जलाशय.....आणि जेव्हा अस्तित्व वास्तवतेशी एकरूप होत, तेव्हा बागेश्री म्हणते, “दोन डोळ्यांची, लख्ख तकाकी, निरखित राहील, एक नितळ तळ ! “....दोन डोळ्यांची लख्ख तकाकी म्हणजे एक तेजस्वी दिव्य दृष्टी..... त्या दृष्टिक्षेपात बागेश्रीची एक गोड अभिव्यक्ती कवितेच्या /साहित्याच्या विश्वात प्रगट झाली आहे.


    ReplyDelete