पावसाळा

मी तुला कपात भरून पावसाळा देईन
बदल्यात तू मला
भुरभूर ढग दे
एका कुपीत बंद करून...

कधी एकांतात
मी एकटी असताना
अंधार मिट्ट करून 
आवडीचा तलत ऐकताना
अलगद मोकळे करेन
माझे बंद ढग
पसरू देईन कुपीतून
घरभर....
तुही अगदी तेव्हाच
कपातला पाऊस
उपडा कर आणि
व्यापू दे त्याला
तुझं गर्द आभाळ.. तुझं इवलं घर

इथे ढग
तिथे... पाऊस
इथे तलत
तिथे... पाऊस

मग मीही हळू हळू, विरघळून जाईन
हलके हलके, ढग होईन
तुझ्या आभाळी, रेंगाळत राहीन
तेव्हा मृदगंधातून श्वासामध्ये, तू ओढून घे मला
आणि तेव्हाच घे भरून
तुझ्या कपात, तुझा पावसाळा!

इथे मात्र
कलंडलेली कुपी
नि तलतचे सूर
न्याहाळत राहतील.. एक रिकामी खुर्ची!

Post a Comment

0 Comments