काळाची चटई

तुमच्या आमच्या पायाखाली
अंथरलीय एक चटई, काळाने!
त्याच्या कुसरदार हातांनी विणून
आपल्याला दिसतेय तिथेपर्यंत
आणि दिसत नाही त्यापलीकडेही....सर्वदूर अंथरलीय
आणि नकळतच
आपण सगळे जोडले गेलो आहोत
परस्परांशी, त्या चटईच्या तंतूंनी!

वावरतोय आपण त्यावर
अथक, अविरत
पृथ्वीचं आवरण समजून
आपल्या सगळ्यांचे पडसाद
आदळत आहेत एकमेकांवर
अखंड!
वाटतं आपल्याला,
आपण घेतलेला निर्णय
आपल्या भावना
सुखदुःखे फक्त आपली आहेत
पण नाही
आपण सगळे जोडलेले
दिसणाऱ्या, न दिसणाऱ्या
ह्या उभ्या आडव्या धाग्याच्या विणकामावर
चालता चालता
आपण कुठेतरी उभे,
कुणाच्या तरी जागेवर!

ह्याच विशाल चटईवर
काळ मूलाचं रूप घेऊन
रांगताना दिसेल कधीतरी..
त्याला कडेवर घेण्याचा
मिठीत घेण्याचा मोह, शेवटचा.
त्यानंतर तुम्हीही व्हाल, चटईचीच एक वीण.
पुन्हा कधीही न उसवणारी...

-बागेश्री

Post a Comment

0 Comments