निर्झर

आपल्या आत,
खोल उरात
असतो एक झरा
मनाच्या काठावरून
अंतरंगात, अविरत
कोसळणारा!

त्याला कळत नाही
कुठलीही भाषा
कोणता व्यवहार
कुठली नाती वा परिवार
तो जाणतो फक्त
उसळणं उतरणं
शुभ्र तुषारांतून
प्रवाहात कोसळणं...
                     
आयुष्याला      
चैतन्यदायी राखण्याचा
एकमेव वसा घेऊन
 ...आपल्या आत
खोल उरात
कोसळत राहतो एक झरा
मनाच्या काठावरून,
अंतरंगात
अविरत.. अविरत!

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. हे एक बागेश्रीने तिच्या अंत:करणात ऐकलेले, पाहिलेले संवेदन आहे. मनाच्या काठावर, मनाच्या जलाशयात तरंगीत होणारा प्रवाह असतो.हा झरा आहे,निर्झर...म्हणजे एक अनाहत नाद...तो कवयत्रीच्या गात्रांवरील अभिसरण होतो,तेव्हा त्यांचे कोसळणे,चमकणे,लकाकणे,उडणे,पडणे, जाणणे,उसळणे....आणि शुभ्र स्फटिक-तुषार अशी रूपे घेऊन अविरत चालणा-या श्वासांचे लयबद्ध जीवन होऊन जाते.ह्या अनुभूतीचे नाव आहे अंतर्नाद.

    ReplyDelete