मी घरी आलेय...!

मला आवडतो तो प्रत्येक क्षण
ज्या ज्या क्षणी मी परतून
स्वतःकडे येते...!
आणि
मला आस्थेने  विचारलं जातं,
"दमलीस का गं?"
स्वतःला विचारलेल्या, स्वतःच्याच स्निग्ध प्रश्नाने
मी स्थिरावत जाते
होते शांत
आणि सरतो सारा शीण, प्रवासाचा...

पण
मी पाहतेय वाट
त्या क्षणाची, ज्या क्षणी मी
उतरवून टाकेन
माझी प्रवासी बॅग कायमसाठी आणि
हक्काने मागेन, स्वतःकडेच
माझेच जुने, माळावरच्या ट्रंकेतले
जरासे जीर्ण पण खूप कम्फर्टेबल कपडे!
आणि निर्वाणीचे सांगेन की,  आता
थांबतेय. इथेच. संपवतेय, वणवण. कायमची.
मी माझ्या हक्काच्या मुक्कामी आलेय,
"मी... घरी आलेय!"

-बागेश्री

Post a Comment

0 Comments