आयुष्याच्या ढिगा-यात, जबाबदारीची चप्पल!

तो निघतो
आयुष्याच्या ढिगा-यात
जबाबदारीची चप्पल खोवून
अनवाणीच पुढे...
बेदरकारपणे शीळ घालत
मस्तपैकी हातांची बोटे
डोक्यामागे अडकवून
भिरभिर वारा अंगावर घेत..

ही त्याची चाल निराळी
त्याची शीळ निराळी
हसणं निराळं
एवढंच काय तर
प्रौढ प्रौढ डोळ्यातलं
बालपणही निराळं.
पिचलेल्या पाणीपुरीचं
पाणी ओघळू देतो तो,
बिजनेस फॉर्मल्सवर!
आणि विकत घेतो
रंगीत फुगा..
धावतो चौपाटीवर
पाय रोवून काठाशी 
सागरतीरी राहतो उभा
हूळहुळू देतो 
रेती पावलांशी
अन् हसतो खरेखुरे
मिसळू देत
लाटांच्या आवाजात 
आपलाही, मनमोकळा आवाज ...!

दिवस कलताना,
तो ढकलतो स्वतःला 
परतीच्या वाटेवर तेव्हा
जाते निसटून हलकेच,
पावलांवरली कोरडी रेती..
सुटतो हवेत, हातामधला रंगीत फुगा
खाली जाते मुडपलेली,
पोटरीवरची ट्राऊजर
आणि होतो तो हजर
आयुष्याच्या त्याच ढिगार्‍याशी
... जबाबदारीची चप्पल पुन्हा पायात अडकवण्यासाठी!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments