आली शहरे गेली गावे

कुठे हरवली गाव गावकी
आणिक गजबज गप्पा टप्पा
अक्कल शक्कल ह्याची त्याची
ह्याच्या डोकी त्याच्या टोप्या

कुणी बेरका अवली तात्या
जमवी चिंटी पिंटी पोरे
तरुणपणीचा रुबाब सांगे
लावित तोंडी चिंचा बोरे

माड सुपारी कितीक झाडे
भाव भावकी विशाल वाडे
पारावरती मुक्त बैठका
नवी गजाली जुनेच पाढे!

गाई गोठे पाटाचे पाणी
अन पाडातून हसती गाणी
माणूस रमतो निसर्ग जेथे
बोले ऐसी निर्मळ वाणी

लगबग लगबग अशी सर्वदा
गाव असे की भरली जत्रा?
ख्याली खुशाली सुख दुःखांची
प्रेम जणू साऱ्यावर मात्रा..

आली शहरे गेली गावे
माणुसकीची ओल आटली
कुणी कुणाला भरवत नाही
आपुलकीची साय दाटली

-बागेश्री

Post a Comment

0 Comments