दिल तो हैं दिल...

"मै दिल सें सोचता हूं, दिमाग से नहीं" ह्या आणि अशा प्रकारच्या इरसाल संवादांचा जन्म झाला आणि समस्त मानवजातीला हे पटले की जगात फक्त दोन प्रकारची माणसं असतात. एक जो दिल से सोचते हैं, बचे बाकी दिमाग सें!! पुढे पुढे मानव जसा अधिकाधिक उत्क्रांत होत गेला त्याने व्याख्या अजून विस्तृत केली, की हळवी माणसं हृदयाने विचार करतात तर वास्तववादी मेंदूने. आजच्या पिढीच्या भाषेत हृदय इमोशनल विचारांचे तर मेंदू प्रॅक्टिकल!
                अन् हृदय म्हणते, बाबांनो, तुम्ही मातेच्या गर्भात तग धरू लागल्यापासून ते तुमचा ह्या पृथ्वीवरील अवतार संपुष्टात येईपर्यंत मी फक्त आणि फक्त "पंपिंग" करतो रे. रक्त पंप करून तुमच्या अवयवांना अखंडित पुरवणे ह्यात मला क्षणाचीही उसंत नसते (ती उसंत मी घेतल्यास तुमचे काय होईल बघा तुम्हीच विचार करून, इमोशनली & प्रॅक्टीकली, बोथ!" ) .. तर अशात "विचार करणे" वगैरे रिकामे उद्योग हा माझा काही प्रांत नाही! 
       थोडक्यात, इमोशनल होणे. एखाद्या भावनेचा कडेलोट होणे, अपार सुख वा अपार दु:ख हा सारा मेंदूरावांचा खेळ! भाव- भावनांनी आपला ताबा घेणे, आपण त्यात वाहून जाणे हे सारे क्षणिक. कारण पुन्हा आपण नॉर्मल असतोच. अनेक हॉर्मोन्स पिळून, मेंदूने केलेला गडबड घोटाळा जागेवर यायला काही वेळ जातो. हृदयाचे मात्र पंपिंग मात्र तेव्हाही अखंड सुरू. आपला भावनावेगाने कडेलोट झाला तरी आणि आपण नॉर्मल झालो आपण, ते निमूट त्याचे ठरलेले काम करत राहते. तेव्हा त्याला तूर्तास तरी कुठलेही आरोपपत्र न दिलेले बरे.         
...... तुम्हाला अगदी लहानपणापासून शिकवलं जातं. "कंट्रोल".  रागावर, अतिखाण्यावर, ओरडण्यावर ह्यावर त्यावर. अनेक भावनांवर. कुठे जातात ह्या दाबलेल्या भावना? (हृदय तेव्हाही गपगुमान धडधडत आपल्या कर्तव्यात मग्न असतं, त्याचा विषयच नको). तेव्हा आपल्या आत दबलेल्या ह्या भावना निचरा न होता पडून राहतात. ह्या भावना म्हणजे "एनर्जी". होय एनर्जी म्हणजे उर्जा. आपल्याला आनंद, दु:ख, राग येतो ही प्रत्येक भावना उर्जेचे रूप. आनंद व्यक्त करायला ह्या जगाने, समाजाने परवानगी दिलेली आहे. ती उर्जा निर्माण होते, आनंद रूपात व्यक्त होते.
उर्जेचा नियम माहितीय नं? विज्ञान सांगतं
उर्जा न निर्माण होते, न नष्ट! ती फक्त एका रूपातून दुस-या रूपात रुपांतरीत होते.
ह्या जगाच्या निर्मितीपासून ते आजवर, उर्जा तिच आणि तेव्हढीच आहे. तिचे रुपांतरण मात्र अखंड सुरू आहे.
     तर सांगत हे होते की, आपल्या ह्या शिष्ट समाज व्यवस्थेत दु:ख, राग, अश्रू ह्या भावनांना सपशेल आपल्या आत दाबायला शिकवले जाते. ही उर्जा बाहेर न पडता आत ढकलली जाते. ती तिथे खदखदत राहते. कारण तिचं रूपांतरण झालंच नाही. (ह्यामुळे मात्र शांतपणे आपलं काम करणा-या हृदयावर उगाच दाब वाढू शकतो!) 
    मग मेंदूराव काय शक्कल लढवतात, की, एखाद्या प्रसंगात शिष्टाईला धरून काढू देतात राग बाहेर, अशावेळी निमित्त मिळताच थोडे थोडे काही बाही बाहेर पडत जाते (पण अजूनही संपूर्ण निचरा नाहीच हं! अनेक वर्षांचे साचलेले एका क्षणाच्या विस्फोटात कसे निपटून जाईल) पण इथे काय झाले पहा. आपण आपला राग, दुस-या कुणावर तरी काढतो आणि तो ते सारे घेऊन स्वतःमधे दाबून टाकतो.
मग आपण अगदी ह्या क्षणापासूनच काळजी घेतली तर. भावना दाबण्यापेक्षा त्या रुपांतरित करून उर्जेचा चक्क लाभ करून घेतला तर? खूप खूप राग आलाय त्याक्षणी उठून वॉक घेतला तर. किंवा सूर्यनमस्कार, योगा, डान्स. वेळ आणि जागा पाहून काहीही. मला मुन्नाभाई MBBS मधला बोमन इराणी फार आठवतोय इथे. त्याला राग आला की तो खदा खदा हसत सुटायचा (हृदयावर ताण येण्यापेक्षा हे कधीही बरे). हे सांकेतिक आहे असं गृहित धरलं तर भावनिक उर्जा आत दाबण्यापेक्षा तिला कुठलेतरी रूप दिलेले बरे. ते जितके चांगले रूप तितका तुमचा फायदा अधिक! व्यायामाचे रूप देणे हा सगळ्यांत सुंदर उपाय. नाहीतर त्वरित काही छान वाचत बसावे. त्यावर चिंतन. मेंदूला दुसरा उद्योग मिळतो. उर्जा चिंतनात रुपांतरीत होते. आपली सिस्टीम फार सुंदर आहे. तिला समजून घेऊन तिच्याशी मैत्री केल्यास आपल्यालाच अनेक फायदे आहेत.
 
            आपण सारी उर्जा आत दाबून ठेवतो म्हणून मेंदूला ते सारखे इमोशनच्या स्वरूपात मॅनेज करावे लागते. थोडक्यात सगळा कारभार त्या मेंदूरावाचा आहे हो. हृदय काय,  दिवस- रात्र इमाने- इतबारे नेमलेले काम करतोच आहे..... रक्त पुरवठा ! अविरत पंपिंग! पंपिंग & पंपिंग! त्याने विचार बिचार काही करूही नये म्हणा. बाकी मेंदूरावांचे बरे चाललेय!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments