Insecurity

"हात पुढे कर"
मी तुला माझ्यातली एक 'भीती' देतो
ती तुझ्या मुठीत बंद कर..!
मी जेव्हा जेव्हा,
अहंकाराने माखून येईन
जमिनीवरून हवेत जाईन
तेव्हा तू अधिकाराने
ही मूठ उघड,
आणि वापर
माझ्याविरुद्ध
माझ्यावर
माझीच भीती,
एखाद्या अस्त्रासारखी...!

असे करताना
कदाचित
मला पडेल विसर...की
तू मनुष्यच आहेस.
जीवलग असलीस,
मला खूप घट्ट असलीस तरी
मानवी मर्यादा तुला
चौकट घालतील
आणि तू
तुझ्याच नकळत
वापरू लागशील
स्वतःच्या स्वार्थासाठी
माझ्याविरुद्ध
माझ्यावर
माझीच भीती,
एखाद्या अस्त्रासारखी...!

मी मात्र होत राहीन निष्प्रभ
अस्त्रापेक्षाही जास्त
तुझ्या ठाई आलेला
सराईतपणा पाहून!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments