वचन

प्रदीर्घ विरहानंतरच्या भेटीत
डवरलेल्या आम्रवनात
वेणूस्वरात, तू मग्न असताना..
तुझ्या पायाशी बसून
उत्तरीयाच्या टोकाशी,
माझा चाळा चाललेला असताना
एकाएकी बासरीचा स्वर थांबला, म्हणून मी
वर पाहिले,
तुझे लक्ष वेधून, दूरवर बोट दाखवत विचारले
"आपण कधी उभारूया एक घर कान्हा?,
जिथे विरह नसेल, तू असशील
मी असेन आणि स्थैर्य आपल्या जीवांना!"

तसे विस्मयीत नजरेने
तू माझ्या डोळ्यांत खोल पाहिलेस, कान्हा
आणि सुरू केलास काळ्या टपो-या डोळ्यांनीच संवाद
माझ्या आत्म्याशी, म्हणालास -
"तुला कधीपासून थांबावे वाटू लागले राधे?
आपण अनंत काळ होतो, आपण अनंत काळ आहोत
क्षणिक धारण केलेल्या मानवी देहाच्या
संमोहनात कशी आलीस सखे, स्थैर्य मागून बसलीस?
मी वाहत राहिलो आहे
मी वाहत राहणार आहे
थांबण्याची मुभा नाही
माझ्या आत अखंड वाहणारा प्रवाह म्हणजे "राधा"..
तिनेच स्थैर्य मागावे?
उद्या गोकूळ त्यागावे लागेल, कधीही न परतण्यासाठी
माझे कर्म अखंड पार पाडत असता राधे, प्रसंग येतील
जेव्हा तुझा हा जीवलग, विषादाने भरून जाईल
दु:खाने भारून जाईल. वाकेल पुर्णतः जगण्याच्या जडत्वाने
थांबतील वाटा. दिशाही दाही.....
तेव्हा राधे
हे माझ्या अतंस्थ प्रवाहा,
तुलाच तर माझे जगणे प्रवाही करायचे आहे
मला पार न्यायचे आहे......"
नकळत माझी बोटे तुझ्या राजस पावलांवर फिरली कान्हा,
आणि मी अबोलपणे वचनात गुरफटले....
प्रवाही राहण्याच्या....!

-बागेश्री
Post a Comment

0 Comments