तारणारी मैत्री

आम्ही साध्या गावातून, टियर टू शहरांत, तिथून मेट्रो शहरात रहायला गेलो. कर्मभूमी म्हणून मुंबईत आलो. रूजलो. स्थिरावलो.
    या दरम्यान, विविध सामाजिक अवस्था पाहता आल्या. समाजव्यवस्थेच्या गाव, शहर यानुरूप गरजाही पाहिल्या. या सगळ्यांत अतिप्रंचड सामाईक किंवा आपण 'मुलभूत गरज' म्हणू. ती दिसली. "गप्पा मारण्याची गरज."
     गावोगावी स्त्रियांना घराबाहेरचे ओटे, ओस-या तर पुरुषांना चौकातले पार वा कट्टा! आठवडी बाजारातले छोटे- मोठे कोपरे, किंवा भुसारी माल विकत घ्यायला जाऊन झालेल्या गप्पा. गावाकडे तर मुद्दाम भेटायला जाणे आणि पुढ्यात ठेवलेला चिवडा लाडू फस्त करत चिक्कार गप्पा मारणे. निघता- निघता, निरोपाच्या निमित्ताने दारात, अंगणातल्या गेटपाशी  उभे राहून "तर, मी काय म्हणत होतो...." करून पुढील तासभर शिळोप्याचा गप्पा सुरूच. ते "अरे दारात काय उभेsss? बसून बोला बाबांनो" अशी घरातल्या म्हातारीची हाकाटी येईस्तोवर......
                मोठ्या शहरात वेगवेगळे क्लब्स, किंवा मॉर्निंग वॉक, जॉग अथवा टेनिस, बॅड्मिंटनसाठी जमलेले स्त्री पुरूष. पार्क मधे बाकावर जमलेले आजी - आजोबा. तलावाच्या भोवती कठड्यावर प्रेमी युगुल. मित्र मैत्रिणी. कॉफी शॉप्स, मॅक्डोन्ल्ड्स. शॉपिंग मॉल्स. अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे. गप्पा. बडबड. मनातले सांगणे, ऐकून घेणे. जमेल ते तोडगे काढणे. नाहीतर किमान "घाबरू नको. मी आहे ना तुझ्यासोबत" असे आश्वासक स्पर्श, शब्द देणे. घेणे.

                   आज कितीही फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप किंवा अजून काहीही आलेले असले. तरी वरील चित्र अगदीच मिटून गेलेले नाहीये. ते दिसते. ते आहे.
कारण त्यामागे एक अशी पिढी होती जिने, रक्ताच्या नात्यापलिकडे ऋणानूबंध जोडले. मैत्री जाणली. शेजारधर्म जाणला. किंबहूना स्वतःची मोकळे होण्याची गरज जाणली. माणसाला माणसे हवी असतात. जगायला. जगवायला. ही सुक्ष्म उमज न जाणो कित्येक वर्ष रूजून आहे. आणि म्हणूनच इंटरनेटच्या आभासी विश्वात रमणारे शेवटी जेवण्यासाठी डायनिंग टेबलवर खर्‍या खुर्‍या कुटूंबाबरोबर गप्पा मारत जेवतात. जेवायला हवेत.

                  कालपासून फेसबूकवर आत्मघातकी प्रवृत्ती रोखण्यासाठी "मी अवेलेबल आहे, माझ्या घरी गप्पा मारायला या. माझ्या घरात दूध कॉफी आहे. मोकळे व्हा. पण आयुष्य नका संपवू" अशा आशयाचे मेसेजेस पोस्ट होत आहेत. खरंच? असतं का असं? एकलकोंडा झालेला, एकटा पडलेला, नकारात्मक विचाराने संपूर्ण ताबा मिळवलेला जीव, तुमची फेसबूक पोस्ट आठवेलच कसा आणि कॉफी प्यायला येईल कसा घर शोधत. कबूल. त्या क्षणी त्याला एक हात हवा आहे. जो त्याला पुन्हा जीवनात ओढून आणेल. परंतू, तो हात तुमचा माझा असू शकत नाही. तो हात फक्त त्या क्षणी फक्त तोच स्वतःला देऊ शकतो.  इतकी त्याची स्वतःशी गट्टी असायला हवी. कारण, त्या एकट्या क्षणी, त्या फोल क्षणी त्याच्याबरोबर फक्त तोच असणार आहे. त्याच्यातला मित्र तेव्हा दुबळा ना पडता "छोड यार, जियेंगे तो और भी लडेंगे" हे ठासून सांगणारा हवा.

        मागील पिढीने खूप काही दिले. या पिढीला स्वतःशी मैत्री शिकावी लागणार आहे. स्वतःला तारणारी मैत्री. घट्ट मुट्ट मैत्री. बाल, तरूण प्रत्येकालाच. निर्वाणाच्या अशा क्षणात किमान "तेवढा एक क्षण" टोलावून त्याला बाहेर आणण्याची जबाबदारी पार पाडणारी मैत्री. नंतर आपण असतोच. आधीही आपण होतोच. पण आपण तो प्रकाश नसतो जो आपल्या मित्रे- नातेवाईकाच्या मनाच्या सांधी कोप-यात जाऊ शकू आणि पाहू शकू, कुठे काही वाईट, आत्मघातकी लपून तर बसलेले नाहीये ना?
          हा प्रकाश फक्त स्वतःचा असू शकतो. जो- तो आपल्या मनाचे सांधी कोपरे उत्तम जाणत असतो. त्या नकारात्मक अंधाराला स्वतःच्या मैत्रीचाच उजेड हुसकावून लावू शकतो. आपला हात, आपल्या हाती घट्ट असू द्या. तिथे दगा नसतो. आश्वासन असते. जगण्याचे. प्रेमाचे. तरण्याचे. या जगात उरण्याचे!

-बागेश्री


Post a Comment

1 Comments