व्यक्तिमत्व एक झाड

आपलं व्यक्तिमत्व एक झाड. आणि. आपली प्रत्येक गरज म्हणजे त्याची एक- एक फांदी.

              आपल्याला समजून घेण्याची गरज, आपल्या हुशारीला, व्यवहार चातुर्याला, चालाखीला, निरागसतेला, आपल्यातले अजिंक्य, आपल्यातली हार, नैराश्य, उदासी, खेळकरपणा आणि आपल्याइतकंच वेडं होऊन उत्स्फूर्त टाळी मिळण्याची गरज.  आपलं फक्त ऐकून घेण्याची, आपल्याला समजावून सांगण्याची, आपल्या सोबत मुक्त उडण्याची, आपण गाताना आपल्या सोबत गाण्याची, आपण हरवले असता आपल्यासोबतीने हरवण्याची, गवसण्याची, बुडण्याची, तगवण्याची गरज.
             अशी आपली प्रत्येक गरज म्हणजे त्या झाडाची एक फांदी. म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्त्वला लाख फांद्या.  चौफेर पसरलेल्या. आपल्यातून फुटलेल्या.....

इवल्याशा रोपट्याचं झाड होणं. प्रक्रिया! म्हटली तर सहज, नैसर्गिक. म्हटली तर जाणिवा जागृत होताना लक्षपूर्वक केलेली. झाड पूर्ण वाढलं. बहरू लागलं. मोहरलं. की पोषणाची भ्रांत उरत नाही. उत्कर्षाची उरते. ही जाणिव सजग होताच गरजेच्या फांद्या लवलवू लागतात. फोफावू लागतात. झाड जितकं डेरेदार. बहरदार. तितक्या विपुल फांद्या. जितक्या विपुल फांद्या, तेवढाच संभाव्य उत्कर्ष मोठा.

कधीतरी, कुठल्यातरी, एका फांदीवर, येऊन बसतो, एक पक्षी. फांदी डोलून पाहते. पक्षीही चाचपून पाहतो. ओळख पटते. दोघांच्याही गरजेचे वर्तूळ पूर्ण होते. विकसीत होण्याकरता अशी वर्तूळंच कारणीभूत ठरतात, या विश्वासाने दोघेही मोहरून जातात.
                         हळू- हळू प्रत्येकच फांदीला मिळू लागतो, हक्काचा पक्षी. 

गरजपूर्तीच्या आनंदाने बहरलेलं झाड अधिकच संपूर्ण, संपन्न दिसू लागते.  पण निसर्ग खरा किमयागार!
                         डेरा जसजसा वाढू लागतो तितके झाड जमिनीशी अधिकाधिक घट्ट जुळू लागते. मुळे अजूनच खोलवर जाऊन ऐसपैस बसतात. आणि झाडाला स्पष्ट जाणवू लागते की, क्षणभर विसाव्यासाठी आलेले हे पक्षी त्याच्या स्थिर, स्वयंभू आयुष्यातले फक्त पाहूणे आहेत. आणि झाडाने त्या अतिथींचा केवळ यथायोग्य सत्कार करायचा आहे. आतिथ्य करायचे आहे. पाहूण्याजोग्याच त्याच्या गरजादेखील कायमस्वरूपी नाहीतच!

   झाड पूर्वीही सक्षम होते. झाड आताही सक्षम आहे....  त्याची नाळ जमिनीशी घट्ट असेस्तोवर ते सक्षमच रहाणार आहे.
                  या जाणिवेनिशी स्वतःच्याच गरजांतून मोकळ्या झालेल्या झाडाच्या फांदीफांदीतून नवचैतन्य संचारतं. आताही पक्षी येतात. झाड त्रयस्थपणे आसराही देतं. पक्षी क्षणभर विसावतात, उडून जातात. आता झाडाच्या हिशोबी कुठल्याच नोंदी नसतात....

-बागेश्री
    

Post a Comment

0 Comments