इच्छा

मी गेल्यावर
झाकू नका माझे उघडे डोळे
घालू नका कापूस नाकात, कानात
फक्त उतरवून घ्या दागिना
आणि पांघरा एक
शुभ्र पांढरी चादर....

सोडून या
काठापासून जरा आत
समुद्रावर तरंगत आणि
निघून जा, मागे वळूनही न पाहता...
येतील मनात प्रश्न की
चैतन्यहीन ही,
पाहणार कशी विशाल उघडे आकाश
अन् निळाईची नक्षी
कोरा करकरीत समुद्र
आकाशीचा पक्षी
जाणवेल कसा आता
खार गार वारा
पडल्यावरती पार
जन्म मृत्युचाही फेरा..
कुठल्या अट्टहासाने केली असेल व्यक्त, हिने
अशी शेवटची इच्छा?
वाटले जरी काही, तरी
नकाच वळू मागे...
जा आलात तसे निघून
आपापल्या हस-या
जीवनाकडे परतून...

माझ्यातल्या चैतन्याची
माझ्या या देहाशी
होती गट्टी जुळून
घेतला आम्ही
प्रत्येक अनुभव संगतीने वाटून
केली पाप पुण्य हाती हात धरून
ठरले होते आमचे, जन्मत:च..
एकमेकांवाचून जगणे ते कसले?
एकाने जाता, दुस-याने उरणे तरी कसले!
एका बेसावध क्षणी मात्र
त्याने घेतली झेप, आकाशात
माझ्या जडत्वाची थट्टा करून
मी पाहत राहिले जाणे
देहाचा द्रोण करून..

मला एकदाच दाखवायचाय त्याला
हा निष्प्राण देह
उडता उडता
कदाचित तो आजही हेच म्हणेल,
"वेडी कुठली, सगळीच वचनं पाळायची असतात होय?"

-बागेश्रीPost a Comment

1 Comments

  1. कलेवराची इच्छा.....बागेश्री, आपला मृत्यू नव्हे तर आपली अंत्ययात्रा पहात आहे.मृत्यू हा एक संजीवन अनुभव...कठोपनिषदात नचिकेत यमाकडे जाऊन जे वरदान मागतो, त्यापेक्षा हे वरदान ह्या कवयित्रीने मागितले आहे, काव्य देवतेकडे.. ज्याच्या जोडीने जीवनसाथ देण्याचं वचन घेतलं, ते पाळण्याची ही जाणीव नसून जीवनसाथीदाराच्या मृत्यूला न्याय देण्याची सौंदर्य दृष्टी....हे ह्या कवितेचं अस्तित्ववादी आकलन आहे. "एकदाच दाखवायचा त्याला,हा निष्प्राण देह " त्याने तिला प्राणप्रिया म्हणून अनुभवलं आहे.म्हणून ती म्हणते, माझा निष्प्राण देह, तू एकदाच बघ....कारण तिला त्याच्या कडून ऐकायच आहे," वेडी कुठली, सगळीच वचन पाळायची असतात होय?" हे एक अभिवादन तिचे आहे, तिच्या स्मृतीकोशातले तिच्यासाठी त्याने जपलेले....ह्या कवितेच सारांशरूप आध्यात्मिक नसून सौंदर्यवादी आहे. बागेश्री, हे परिपोक्त विचारघन तुला नक्कीच अमृताचे थेंब पाजीत आहे.

    ReplyDelete