तू कधी इतके थर येऊ दिलेस, स्वतःवर?

एकटेपणाचे, अस्वस्थतेचे पापुद्रे सोलत सोलत गेल्यावर खाली सापडतं बुजून गेलेलं मन.
कधी त्याने इतके थर येऊ दिले स्वतःवर? उत्तर चाचपडताना आठवतं...
कधी काळी मनाने गुणगुणलेले गीत. "मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे पास आ. मेरे पास आ. हमे साथ चलना है उम्रभर...." त्याने दिलेले हे घट्ट अ‍ॅशुरन्स लाथाडून कुणी निघून गेले तेव्हापासून त्याने हे थर दाटू दिले असावेत...

आपण कोण.. कुणासाठी आपण काय काय करतो
हे समजून न घेणा-यांमुळे येत गेलेला एकटेपणा.

आपण जे आहोत. ते सिद्ध करण्याच्या अखंड प्रयत्नात
वाढत गेलेली अस्वस्थता.

अशी अनेक पुटं जगणं देत जातं. आपणही ती बिनबोभाट दाटू देतो.

जाणिवा जाग्या नसतात तेव्हा साचत जातात हे पापुद्रे .मनावर. आयुष्यावर. झाकून टाकतात आपली नजर. बंद होतं दिसणं आर- पार.
पण एक क्षण येतोच. एक प्रकाशकिरण घेऊन. जो जुमानत नाही कुठल्याच दॄष्य- अदॄष्य पडद्याला आणि पोचतो मनापर्यंत. खोल. आणि विचारतो त्याला-
"तू कधी इतके थर येऊ दिलेस, स्वतःवर?"

आणि सुरू होतो आत्मशोधाचा प्रवास . निर्विकारपणे....
एक एक पापुद्रा सोलताना... तो प्रत्येक पापुद्रा किती व्यर्थ होता. किती खोटा होता. आणि आपण त्याला अवाजवी महत्व देऊन का राखले इतके दिवस असे वाटू लागते. आपण कोण.. हा शोध आपल्यापुरता मर्यादित होतो तेव्हा जगापुढे सिद्ध करण्याचा अट्टहासच संपतो!! आपोआप गळून पडतात सगळे थर कारण, आता ते आपल्यालेखी फोलपटं होऊन गेलेली असतात. मन अलगद सुटतं नकोशा ओझ्यातून. मोकळं होतं.
              त्याने मोकळा श्वास घेणे, ही आपली गरज आहे. हे कळण्यासाठी तरी, किमान एकदा करावा त्याला हा प्रश्न. प्रेमाने. काळजीने.  की बाबा रे "तू कधी इतके थर, येऊ दिलेस स्वतःवर?"
         कधी कधी विचारलं जाण्याची वाट पहात सरून जातं आयुष्य. एका प्रश्नाने ते बोलतं होऊ शकतं. त्यालाही झुगारून द्यायचे असतात नकोसे पापुद्रे पण त्याला गरज असते विचारलं जाण्याची...

शेवटी मनालाच उद्देशून येतील शब्द -
"मेरे हमसफर, मेरे हमसफर, मेरे पास आ. मेरे पास आ. हमे साथ चलना है उम्रभर...."

-बागेश्री

Post a Comment

0 Comments