दागिना

सोडून दिलेल्या को-या पानांवर
लिहिणार होते काही कविता...
परिस्थितीचा चटका
नात्यांची धार
सावरलेला हुंदका
आपल्यांचे वार...
काळजातले ढग
नाचणारा मोर
हरवलेले चित्त 
राधा भावभोर..
गेला राहून लिहायचा
पाऊस तो गारांचा
वेडावारा सोसाट्याचा
धपापते उर,
निरोपाच्या कातरवेळचे
डोळ्यांमधले पूर.....

वेळेच्या काट्यानेच कधी, दिली नाही उसंत
नाही टिपली पानगळ, टिपला नाही वसंत

आता मी ती सगळी कोरी पानं, एकत्र करून
घडवलीय वही.. एक, स्वच्छ, कोरीपान वही!
आणि जपते तिला जिवापाड.. तसाही
माझ्याकडे एक तेवढाच तर आहे,
ठेवणीतला दागिना..!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments