जिव्हाळ्याचं बेट

घरातल्या घरात असावं एक,  काही न मागणारं पण भरभरून देणारं आपल्या हक्काचं, जिव्हाळ्याचं बेट!  जिथे कधीही नांगर टाकावा आणि सुशेगाद पडून रहावं. त्या एका बेटावरून जगभराचा प्रवास करावा. नात्यांच्या पोटात शिरावं. हळव्या भावनांनी थरारून जावं, बसल्या जागी भरून यावं. अंगभर फुलावा शहारा, विसरल्या गोष्टींना स्पर्शून यावं.... हक्काच्या त्या बेटावर वाटेल तेव्हा, वाटेल तितका वेळ पडून रहावं!
                  नवी- जुनी सारी पुस्तकं पोटात घेऊन माझ्या जिव्हाळ्याच्या बेटावर उभं आहे एक कपाट. त्यातलं कुठलंही पुस्तक मी हाती घेते..  कधी दुमडल्या पानांतून तर कधी को-या पानांच्या वासांतून सैर करते. या प्रचंड जगात नाहीतर कुणाच्या चिमुकल्या भावविश्वात फेरी मारून येते. मनाचं समाधान झालं की नांगर उचलून चालू लागते. मनातली कुठलीही पोकळी भरून काढायला समर्थ असतात ही बेटं. जी एकदाच तयार करावी लागतात. नंतर ती फक्त 'असतात'. आपल्यासोबत. आपल्याकरता. हवी तेव्हा, कायमची! 
                आपण वाटेल तेव्हा ह्या बेटांच्या जवळ जावं ते आपल्याला कवेत घेतात. स्वतःपासचं सारं काही देऊन आपल्याला भारून टाकतात. आजच्या पुस्तकदिनी मी माझ्या जिव्हाळ्याच्या बेटाला कडकडून मिठी मारलीय आणि सांगितलं त्याला त्याच्या असण्याने माझं असणं समृद्ध केलंय म्हणून. त्याने नेहमीप्रमाणेच मायेने माझ्या डोक्यावरून फिरवलीत त्याची, जिव्हाळ्याची बोटं....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments