एक तरी झाड

गर्द बनातला
हिरवा श्वास
गात्रांमध्ये भरून घेऊन
सहज निभावतील
काही दिवस
शहरामध्ये परत जाऊन

पुन्हा
रहाटगाडगे
सुरू होईल
शहर श्वास कोंडत राहील
गर्दी घुसमट देऊन जाईल
इवले खुराडे सामावून घेईल
दमून थकून गळून घामेजून
जगणे अथक सुरू राहील
पुन्हा
वर्ष भरभर जाईल
हिरव्या बनाची
याद येईल
शिणले शरीर उमेदीने
सुट्टी पडायची वाट पाहील
पुन्हा
तिकीट्स बुक होतील
बॅग्ज खचून भरल्या जातील
हिरवा श्वास घेण्याकरता
शहरे बनात दाटून येतील..
वर्षानुवर्षे पिढी न् पिढी
याच घटना घडत राहतील
मात्र एक तरी झाड लावावे म्हणून
कुणाचे हात मातीने माखतील?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments