कोण बरं बसलं होतं?

मला आठवत नाही नक्की काय तयार करत होतो पण आपल्या दोघांचेही हात मातीने प्रचंड बरबटलेले होते आणि त्या अवस्थेत कडकडून तहान लागली होती. भर दुपारची वेळ. तहानेवर काय उपाय करावा या विवंचनेत असताना, तुझ्या सुपीक डोक्यात "घरीच जाऊत काय?" असा विचार आला. "मार खायचा की काय?" ह्या माझ्या उत्तराने तू गप झालास.
खरं तर आपल्याला दुपारचे जेवू खाऊ घालून आई- मामी घरातले आवरून नुकत्याच लवंडल्या होत्या, त्यांच्या गप्पा सरून घोरण्याचा सूर लागताच आपण हळूच कडी सरकवून घरातून पोबारा केला होता."दुपारच्या उन्हात खेळायचं नाही. घोळाणा फुटतोय. गप घरात बसायचं. घरातच केरम गिरम खेळा काय ते" अशी कडक सूचना असताना आपण बाहेर येऊन मातीत खेळायचं साहस केल्यावर, तू मला विचारत होतास, घरी जायचं का माठात हात बुचकळायला? तू लहान म्हणून सुटला असतास रे. पण एका थपडेत माझा घोळाणा फुटला असता त्याचं काय?
..एवढ्यात धप्पं अशा आवाजाने आपण दचकलो (चोर सावध असतात नै का) पाहिलं तर बाजूला, अगदी आपल्या बाजूला एक आंबा पडला होता. तू लगबगीने तो उचललास. जिथे आपटला तिथे आंब्याच्या डोक्याला चांगलाच मार बसलेला. ती जागा हेरत तू मातकटलेल्या हाताने तो सोललास आणि ही रसरशीत धार. माझ्या तोंडात धरलीस. हनुवटी, फ्रॉक यांच्यासकट मलाही जरासा गोडगिट्टं रस मिळाला. "पुरे मला. तू पी की" असे मी म्हणता तू उरला सुरला सोलून खाल्लास. कोयीचा गर मातीसकट मटकावला आपण. अहाहा. (आताच्या महागातल्या महाग हापूसाला ती चव नाही.) तहान भागून आपण पुन्हा रमलो. झाडाच्या सावलीत, चिखल मातीला आंब्याच्या हाताने भिडलो.
मला आजही प्रश्न पडतो, आपल्याला पहात तेव्हा त्या झाडावर कोण बरं बसलं होतं?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments