मैत्र

कोवळसं ऊन आकाशातून झेपावत पृथ्वीकडे येतंय. त्याची ओढ आदिम आहे. ते हात पाय ताणून देत सांडल्यासारखं सर्वत्र पसरेल. झाडं, पानं, फुलं, नदी, नाले, घर दार खिडक्यांमधून हवे तिथे शिरेल. हक्काने शिरकाव करेल, जागा मिळेल तिथे पडून राहील. आडोसा आला की सावली होईल. त्याला आगंतुकपणाचं वावडं नाही..
      फार पूर्वी आपलं इथे अस्तित्वही नसल्यापासून ते असं तिच्या ओढीनं आभाळ कापत झेपावत उतरतं. आपल्या सिमेंटच्या, काळ्या धुराच्या रेघोट्या तिच्यावर उमटण्याआधीपासूनचं त्यांचं मैत्र असं सोनसळी घट्ट आहे.
         रोज भल्या पहाटे कावळ्यांनी जागं केल्यापासून ती त्याची वाट पाहते. गारठलेला पाण्याचा पदर लपेटून त्याच्या स्वागताला सज्ज होते. तो तिचा आकाशीचा दूत आहे. भरती ओहोटीकरता चंद्राला दमात घेतो. सागराची वाफ करून तिच्याकरता पावसाची सोय करतो. तिला हसरी खेळकर पाहून त्याचं चित्त खुलतं. तीही त्याचा तापट स्वभाव चांगला सांभाळून घेते. कधी त्याचं काही चुकलं तरी त्याला पोटाशी घेते.
         मी रोज सकाळी चालायला जाताना त्यांची ही भेट बघते. कोवळं कोवळं हितगुज त्यांच्या नकळत ऐकते. मग मला वाटतं आपण इथे असू, आपण इथे नसू ते मात्र एकमेकांकरता सदैव असणार आहेत. त्यांचे नियम चुकत नाहीत, भेटीच्या वेळा मागे पुढे होतात बरेचदा, पण रोजची भेट काही केल्या चुकत नाही. कधी आभाळाने सत्याग्रह केला आणि त्याला झाकून टाकलं तर ढगाला कुठूनतरी छिद्र करून ते एखाद्या किरणाला निरोप देऊन घाईने तिच्याकडे धाडतं. 'मी आहे बरं, काळजी करू नकोस. हे वरचं निस्तरलं की आलोच.' तिलाही सवयीने सर्व ठाऊक असलं तरी एवढ्या निरोपाने तिची तगमग थांबते.
      शेवटी ती त्याची ऊर्जा आहे. तो तिची ऊब. हे मैत्र अनादी काल असंच चमचमत राहो....
-बागेश्री

Post a Comment

0 Comments