नॉस्टॅलजिक घमघमाट

.... पळत्या थंडीतलं उन अंगाला चटकेपर्यंत गच्चीत बसून नुकतेच धुतलेले केस वाळवत बसायचं! केसातून गालावर येणारे उन्हाचे कवडसे अनुभवत, शिकेकाई किंवा रिठ्याचा घमघमाट श्वासात भरून घेत निवांत बसलेले असताना "तिळपोळ्या झाल्यात बरंका गरमागरम" आईची हवीहवीशी हाक यायची आणि गच्चीवरून धावत सुटायचं! ही त्या दिवसांची गोष्ट... सक्काळीच स्नानादी आटोपून आई- काकू स्वयंपाकाला भिडलेल्या असायच्या. आमच्या घरी गावातले इतर नातेवाईक जेवायला जमणार असायचे. काकू सकाळीच मदतीला हजर झालेली असायची.. त्यांचे आटोपेपर्यंत आजीबाईनी देवापुढे मातीच्या लहान बोळक्यांतून, टहाळाचे दाणे, साखरेचे काटे उठलेले रंगबिरंगी तिळ, तिळाच्या रेवड्या सजवलेल्या असायच्या. मग तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य बाप्पाला झोकात दाखवला जायचा. हळू- हळू सारे जमले, आणि स्वयंपाकाच्या घमघमाटाने भूक चाळवली, की मिक्स भाजी- तर्रीदार भरली वांगी- बाजरीच्या भाक-या- गाजराचे काप- लोणी- ठेचा- मठ्ठा, आणि... तिळाच्या पोळ्या असा सरंजाम घेऊन, सगळी मंडळी आंडीमांडी घालून, एकत्र मिळून जेवणावर ताव मारायची! पहिला घास घेताच काकाला नेहमीप्रमाणे बुक्की मारून फोडलेला कांदा खाण्याची हुक्की यायची. मग घरातल्या शेंडेफळाला, "छोट्या, परडीतला कांदा आण की एक" अशी आज्ञा सुटायची. तेही उत्साही तुरूतुरू आज्ञापालन करायला जायचे. पुन्हा आपल्या जागी येऊन बसताना मात्र अशा खुबीने पाण्याचा तांब्या पालथा करायचे की काकाला कुठून याला कांदा आणायला सांगितला असे होऊन जाई. पाण्याचा असा गौप्यस्फोट होताच जो तो पटापट एका हाताने आपलं ताट दुस-या हाताने एखादं पातेलं घेऊन उभा रहायचा. छोट्याचा उद्धार करत पाणी पुसण्याचा कार्यक्रम साग्रसंगीत पार पडायचा. काकू "अहो लहान आहे ते, मुद्दाम नै केलं त्यानं. येरे इकडे" म्हणत त्याला जवळ घेऊन जेवायला बसायची. विस्कळीत झालेलं पुन्हा पदावर येत गमती- जमती करत पंगत रंगायची. गुळपोळी चिवडून झालेली बारक्यांची गँग खाली खेळायला उतरायची. त्यांच्या ताटातलं उष्टं त्यांच्या आया हळूच आपापल्या पानात घ्यायच्या. आता मात्र मोठ्यांच्या ख-या गप्पा रंगायच्या!! आई काकूच्या सकाळपासून झालेल्या दगदगीवर या गप्पांचा खरा उतारा असयाचा. एकमेकांना आग्रह करत यांचे चक्क तासभर जेवण चालायचे. ती मैफिल पाहण्याचा मोह मला कधीच सुटला नाही. मोठ्यांचे एक वेगळे रूपत्या पानावरच्या गप्पांमध्ये मी पाहिलेय. त्यांनी पाणी आणून दे, किंवा एखादी चटणीच आणून दे निमित्त करून मी तिथे रेंगाळायचे. मोठ्यांना असे रिलॅक्स असताना पहात रहायचे. त्यांच्या गप्पा कळत नसल्या तरी, या एकमेंकांमध्ये किती घट्ट प्रेम आहे, याची जाणिव आनंदी करायची. सणावाराला सारे जमून असे निवांत होताना पाहणे, म्हणजे सुख होतं. जेवणानंतर मागचे आवरतानाही, त्यांना बोलायला विषय पुरायचे नाहीत. एका विषयावरून दुस-या विषयावर काय सहज त्यांची गाडी घसरायची. बरं आई, आज्जी, काकू, वहिनी एका ट्रॅकवर बोलायचे तर बाबा, काका, दादा लोक दुस-या. तरीही एकाएकी त्यांचे ट्रॅक एकत्र येऊन सगळे अचानक एकाच विषयावर बोलू लागायचे. ही कला त्यांना कशी आत्मसात होती हे मला कधीच समजलं नाही. सगळी चकाचक आवरा आवर झाली, की खाली सतरंजी टाकून गप्पा आणखी टिपेला जायच्या. पान सुपारीचे डबे उघडत, भरल्या पोटी, कुणी कुठे, कुणी कुठे आडवे होत बोलत रहायचे. हळू हळू गप्पांचे आवाज दबत दबत घोरण्याचे सूर लागायचे. हे असं झाल्याशिवाय सण साजरा झाल्यासारखं वाटायचंच नाही. आईच्या उबेला मी ही सुशेगाद निजून जायचे. चारच्या फक्कड चहाला पुन्हा घरभर वर्दळ होऊन जायची. सणावाराची सुट्टी अशी भरगच्च पार पडायची.... आता एकत्र कुटुंबपद्धती नाही आणि कुणी कुणाकडे फारसे जातही नाहीत. सणवार ज्याच्या- त्याच्या घरी. एक कपल आणि त्यांचं मूल, एवढ्यातच सण साजरे. त्यातही चटकन जेवून, पटकन आवरून जो तो आपला मोबाईल घेऊन बसतो. पूर्वी खरे तर मने इतकी मोठी होती की उणदुणं मिटवायला, संक्रातीची वगैरेही वाट पहावी लागायची नाही. आता माणसंच माणसांपुढे क्वचित येतात. त्यांचे राग- लोभही व्हर्चुअल! त्यात सणावाराला व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छा पाठवल्या की, "मी दिल्या बाबा शुभेच्छा" हे समाधान पांघरून, दिक्षित- दिवेकर डाएट नावाखाली इन-मिन अर्धी तिळपोळी खाऊन दुपारी गाढ निजून जायला होते...... दररोजच्या जगण्यात बदलत काहीच नाही आणि मागे पाहिल्यावर सगळंच बदललेलं असतं. तव्यावरच्या तिळाच्या पोळीला सुटलेल्या नॉस्टॅलजिक घमघमाटाने मला जुन्या दिवसात चक्कर मारून आणली, एवढं मात्र खरं! -बागेश्री


Post a Comment

0 Comments