शेला

...... सारे जगणे एकवटून
ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण हाती घेऊन
उभा होता तू पाठवलेला एक गोप
त्याच्या ओंजळीत होता चुरलेला आम्रमोहोर...
तुझ्या- माझ्या एकांतातली खूण!

तो म्हणाला "यमूनेपल्याड श्रीकृष्ण आपली
वाट पाहतायत"
मला खात्री झाली,
पल्याड नक्की तूच उभा आहेस, कारण
यमुनेवर फुलू लागले आनंदतरंग
हवेला सुटला वैजयंतीचा दरवळ
शुभ्र ढगांना येऊ लागले सावळे काठ
एकाएकी वातावरण धुंद कुंद झाले मुकुंदा
मला कळले, तू आला आहेस
तूच आला आहेस...!
पण का सख्या?
तुला चार पावलं पुढे यावे वाटले नाही?
पार करावी वाटली नाही यमुना?
तू पाऊल उचलले असतेस
तर यमुनेने तुला वाट करून दिली असती,
हे ठाऊक असतानाही,
तू असा निरोप धाडावास?
कुणा एकाकरवी?
काय आडवं आलं ?
सुताचे जाऊन रेशमी झालेले उत्तरीय की
मोरपीसाजागी आलेला मुकूट?

मीही अडले
त्याला धाडले, माघारी
म्हटलं, येऊ दे साक्षात तुझ्या श्रीकृष्णाला इथे
राधेची मनधरणी करायला...
विचार म्हणावं,
पुढ्यातून वाहणा-या यमुनेलाच
किती काळ तिष्ठली आहे त्याची राधा?

सकाळची दूपार
दुपारीची सायंकाळ झाली सख्या
न तू आलास न माघारी गेलेला गोप,
मी उतरवला माझा शेला आणि
घातली उडी
पार केली अस्वस्थततेची यमुना..
पण तिथे तुझ्या शेकडो पाऊलखुणांखेरीज
माझ्या हाती काहीच आलं नाही
तू घातल्या होत्यास
असंख्य येरझा-या
यमुनेच्या काठावर.....

कशी रे वेडी मी?
कशी हे विसरले की
गोकुळाला तू दिल्या होतास
बाळलीला करणाऱ्या
कान्हयाच्या अभेद्य आठवणी!
मुत्सद्दी श्रीकृष्णाची सावलीही त्यावर नको
म्हणून आज
इथेच थांबून माझी वाट पाहत राहिलास...

तुझ्या पाऊलखुणा
ओंजळीत भरून घेताना आठवत गेले,
एकदा माझा भरजरी शेला हाती धरून
म्हणाला होतास,
"जप हो राधे, मानवी अहंकाराचे कंगोरे मोठे अणुकूचीदार, कधीतरी अडकायचे याचे टोक त्यात!!"
अन् हसला होतास खळखळून
पण 
असे अडकलेच टोक तर,
तो शेलाच त्यागून द्यावा
हे मला किती उशीरा सुचले कान्हा...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments