मेळ

काहीतरी तुटत असताना
आत असते ना एक जाणीव,
होईल सगळं व्यवस्थित
येईल पुन्हा जुळून!
जाणिवेची त्या सारी
असते मदार
कशावर?
नात्यांच्या
गुंफलेल्या,
धाग्यांवर नि दो-यावर!
साकारताना नातं आपण
विणतो ते घट्ट- मुट्ट!
तरीही
वीण तटतटताना
दिसते कधी उसवताना
पण आत आत वाटतं
असेल हे तात्पुरतं
आयुष्याच्या खेचाखेचीत
वरखाली झालेलं
चुकला टाका तरीही
फार नाही बिनसलेलं
करतो जरा दुर्लक्ष
हाच विचार करून की
होईल सगळं व्यवस्थित
येईल पुन्हा जुळून!
खूप जगून झाल्यावर
मागे वळून पाहिल्यावर
वाटत रहातं नंतर
उगा वेड्या आशेला
धरलं गृहीत निरंतर
तेव्हाच जरा खरंतर
हवं होतं थांबायला
उसवलेलं सांधायला
संबंधाच्या धाग्यांना
पुन्हा घट्ट बांधायला...
नसतीच गेली हातची
टळून एक वेळ
राहिला असता टिकून
नात्यांचा अखंड मेळ.....
-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete