वळणावरचं घर

एकसुरी लांब रस्ता तुला कधी आवडायचा नाही, वळणाची वाट पाहत डोळा तुझा दमायचा नाही...
म्हणूनच वळणावरचं, तुला
घर माझं आवडायचं
येता जाता वळणावरती
रेंगाळणं तुझं व्हायचं...

खिडकीतून माझं मग
तुला पाहत राहणं
उबदार हवेचं गार गार होणं!
गुलमोहराने लालबुंद, गच्च मोहरून येणं
व्हराड्य़ाचं दाराबाहेर, आश्वस्त होत जाणं...

हळू हळू वाढत गेलं
नजरांचं फितूर होणं
पावलांचं रेंगाळणं
हुरहूर घेऊन झोपणं अन्
रोज एक स्वप्न
सकाळी धडपडून पुन्हा 
वेळेमध्ये उठणं
घड्याळात बघणं
तुझ्या वेळेत
खिडकीत येऊन बसणं!

तूही तिथून रोज, न चुकता जायचीस
कधी सहज कधी मुद्दाम
उगाच रेंगाळायचीस

हातातली तुझ्या वह्या पुस्तकेच पडायची किंवा
कधी न दिसणारी काडी पायी रुतायची
गुलमोहराची कळी नेमकी तिथे वेचायची
सावरलेल्या केसांना एकसारखे करायचीस..

वर्षे सरली
वय झाले
सारे मागे पडले
आता कधी वठला गुलमोहोर
थकल्या व्हरांड्याशी, गप्पा मारत बसतो
आपल्या वेडेपणाला हसतो की,
गप्पांच्या निमित्ताने
तो ही
जुन्या आठवणींत रमतो?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments