फुंकर

पिकलेली जांभळं पायाखाली येऊ लागतात, त्यांचा गोड तुरट वास नाकात शिरतो आणि लहानपणी पाहिलेलं, एखाद्या मंदिरामागचं, एखाद्या गच्चीवरचं झाड आठवतं. कौलारू छपरावर वाकलेलं, छपरावर टपटपून ठिपक्यांची नक्षी काढणारं भरगच्च झाड. सहज हात लांबवावा झाडावरची जांभळं काढून तोंडात टाकावीत. बी तोंडात धरून मारलेल्या गप्पा आठवतात. चिक्कार जांभळं खाऊन घशाला बसलेला तोटरा आठवतो, काळे निळे हात ड्रेसला पुसल्यावर आईच्या नजरेत आलेली जरब आठवते. पायाखाली आलेलं एक जांभूळ आठवणींच्या गावात अशी फेरी मारून आणतं आणि "कुठून कुठे गेलो आपण" वाटून स्वतःशीच हसू येतं, तेवढ्यात आकाशाकडे लक्ष गेल्यावर जाणवतं, आकाशही गाभुळ होऊ लागलंय... जून लागलाय!
          जस जसे दिवस मृगाकडे सरकतात, काहिलीचं रूपांतर जीवघेण्या घुसमटीत होऊ लागतं. वारा पडतो. ऊन पळतं. वातावरणभर निःशब्द कळकळ साचून राहते. मुंग्या वारुळाबाहेर येऊ लागतात नि त्यांच्या पावलानेच कसाबसा जूनचा पहिला आठवडा सरतो. अखंड घामाच्या धारा पुसताना शेकडो लोकांच्या तोंडी "ये रे बाबा एकदाचा..." या आर्त विनवणीशिवाय काहीच नसतं. बघता बघता हवेतला कळकळ अशी टिपेला जाते की मळभाचा फुगा सारं आकाश व्यापून टाकतो.. एका क्षणी वातावरणालाच ही गुदमर असह्य होते, गार झुळका सुरू होतात नि वाऱ्याच्या बोटांनी, विजेच्या नखांनी फुगा एकदाचा फुटतो. सरीवर सरी बरसू लागतात. ऑफिसमधून, रस्त्यावरून, गाडीतुन, सायकलवरून, झोपडीतून, रानामधून, घरातून, शेतातून लाख नजरा वर होतात. आकाशाला नजरेतून धन्यवाद पोहोचवतात.
      असा तो येतो..... वर्षभर ज्या भेटीची वाट पहिली ती आश्वासक भेट होऊन. मनांना सुखवणारा गारवा होऊन, होरपळलेल्या जीवांकरता, चैतन्याची फुंकर होऊन...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments