आरामखुर्ची

तसं तर कुणीच कुणाचं नसतं, म्हणत म्हणतच नाती तयार होतात. एकमेकांत गुंततात. ही गुंतवणूक इतर कुठल्याही प्रॉपर्टीपेक्षा मोठी होत जाते. आणि आपलं भावविश्वच दावणीला लागतं. तेव्हा विचार येत नाही ही नाती आधी नव्हती, तेव्हा आपण कसे जगायचो, काय करायचो, कसं जमलं सगळं. आता इतकं कसं एखादं नातं महत्त्वाचं होऊन बसलं? उत्तरं सापडत नाहीत. पण हे निसर्गनियमाला धरून चाललेलं असतं. आपलं मन शोधतच असतं, एखादी आरामखूर्ची जिच्यावर सगळा भार टाकून आपण झोकून द्यावं स्वतःला आणि घेत रहावेत सुखद हेलकावे त्या खुर्चीच्या 
जिवावर. खुर्चीही उदार मनाने, आपल्याला सामावून घेते. आपल्या गरजा समजून आपल्याबरोबर हेलकावे घेते. मग सुरू होतो प्रवास त्या खुर्चीवर हक्क दाखवण्याचा. वाटेल तिथे वाटेल तेव्हा खुर्चीने आपल्यासाठी उपलब्ध असावे. आपल्या सवडीनुसार, आपल्या गरजेनुसार. खुर्चीची कुरबूर मात्र आपल्याला रूचत नाही. तसं तर कुणीच कुणाचं नसतं, हे आपलंच वाक्य आता आपल्याला पचत नाही. आपल्याकरताच आपली ही खुर्ची आहे, यापल्याड इतर विचार झेपत नाही...... नात्यातला कुणी एक असा सहजच निसर्गनियमाने, मनुष्यधर्माने अप्पलपोटी होत जातो आणि नकळतच खुर्चीला आतल्या आत वाळवी लागते. हे इतकं नकळत घडतं की अरे सगळं तर आलबेल आहे, पण मग सुखाचे हेलकावे गेले कुठे?? मन शोध घ्यायला लागतं...
          त्यामुळेच, कधीतरी मधेच एकदा थांबावं, स्वतःला तपासून विचारून पहावं, हक्काच्या नात्यांंत आपणही अधेमधे होतोय ना, समोरच्याची आरामखूर्ची?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments