चंद्रयान 2

वेळ : आज पहाटे १ वाजून ३८ मिनिटे
"शेवटची १५ मिनिटे" त्यानंतर चंद्रयान २ चे  विक्रम लँडर चंद्राच्या 'दक्षिण ध्रुवावर' उतरणार. जगभरातून केला गेलेला पहिलाच प्रयत्न. भारताचं धाडसी स्वप्न. इस्रोच्या मिशन कंट्रोल रूममधे स्वतः मोदीजी हजर. काचेच्या केबिनमधून समोर दिसणा-या मोठ्या पडद्यावर सर्व विज्ञानकांची नजर. क्षणाक्षणाला "विक्रम" ची स्थिती दिसतेय. चंद्र विक्रमच्या ३० किमी च्या टप्यात आलेला... विक्रमची गती १६८० मीटर प्रती सेकंद... आता लँडिगच्या तयारीने विक्रमची गती कमी होतेय.... मिनिटा मिनिटाने चंद्र जवळ येत चाललेला. वेगही मंदावत चाललेला... सर्वकाही आलबेल. अगदी ठरल्या प्लॅनप्रमाणे. इतक्यात कळलं की विक्रमने "रफ ब्रेकिंग पॅच" यशस्वीरित्या पार केला.  वैज्ञानिकांचे डोळे चमकले. आनंदून टाळ्या झाल्या... महत्त्वाचा टप्पा पार पडला... विक्रम चंद्राच्या फार जवळ पोहोचत चालला.. शेवटची काही मिनिटे आणि मग चंद्रभुमीवर एक स्मूथ लँडिंग. सगळ्यांचे श्वास रोधले गेले. समोरच्या स्क्रीनवर विक्रम आणि चंद्रातलं कमी जाणारं अंतर उमटतंय.. उरले शेवटचे ३ किलोमीटर... विक्रमचा वेग कमी होत आता फक्त ५९ मीटर प्रती सेकंद झालेला... उरले शेवटचे २.५ किलोमीटर, वेग कमी, अंतरही कमी होतंय, लँडिंगची सर्व तयारी  उत्कृष्ट... चंद्र अवघा २.४ किलोमीटर वर..... नजरा एकटक स्क्रीन पहातायत.. आता शेवटचे २.३.... आता २.२ किमी..  २.१ किमी आणि मग..... आणि मग... अचानक अंकच थांबले. स्क्रीनवर वेगाचे, अंतराचे आकडे एकाएकी अडकले. २.१ किलोमीटर... पुढे काय? काहीच उमटेना. फ्रेम फ्रीझ. खरंतर आता किलोमीटर धाड्धाड कमी व्हायला हवे, वेग मंदावून शून्यापशी जायला हवा... ही शेवटची मिनीटं जिथे विक्रमाने चंद्र पादाक्रांत केला ही बातमी यायला हवी.. सगळ्यांचे प्राण डोळ्यांत जमा. पण आकडे मात्र स्थिर. स्क्रीनवर काहीच हालचाल नाही.  काही मिनिटे नुसताच तणाव... सगळ्यांच्या चेह-यावरची आशा काळवंडत चालली... आणि इस्रोचे चेअरमन के. शिवन म्हणाले "आपला विक्रमशी संपर्क तुटला आहे..."
      मोदी खाली आले... मघाशी टाळ्या पिटणारे वैज्ञानिक अगदिच सुन्न हवालदिल झालेले पाहून ते त्यांना म्हणाले "मुळात इथवर पोहोचणंही दिव्य होतं... तुम्ही ते केलंत.. निराश नका होऊ... मी आहे तुमच्यासोबत.. लेट्स होप फॉर दि बेस्ट....." 
मोदी इस्रोबाहेर पडले..
वेळ : पहाटे ४
विक्रमशी संपर्क झाला नाही. त्याने लँड केले, की अपघात झालाय... कल्पना नाही.
वेळ : सकाळी ६
विक्रमशी कुठलाच संपर्क नाही...
वेळ : सकाळी ७
विक्रमकडून प्रतिसाद नाही
वेळ : सकाळी ८
मोदी पुन्हा इस्त्रोत हजर. समोर वैज्ञानिक बसलेले. जरासे हताश, निराश. मोदी त्रिवार "भारत माता की जय" म्हणाले... बोलू लागले... म्हणाले... परिणामांची चिंता करून प्रत्येक प्रोजेक्ट होत नसतो. प्रयोग करत राहणे हाच विज्ञानाचा गाभा. आजवरचा आपला इतिहास हेच सांगतो की आपण खचून जाणा-यातले नाही आहोत उलट आतातर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवण्याचा निर्धार कैक पटीने दृढ झाला. मोदी बराच वेळ बोलले सगळ्या वैज्ञानिकांचं मनोबल वाढवत राहिले, शेवटी म्हणाले "मी ही तुमच्याबरोबर इथे होतो. तो क्षण मी ही जगला आहे. परिणम काहीही होवो पण लक्षात घ्या "हा प्रवास शानदार होता" ह्या प्रवासाने अनेक टप्प्यांत यश दिलं आनंद दिला. ते महत्त्वाचं आहे...."
मोदी निघाले... कारकडे जाऊ लागले
के. शिवन बाहेर आले. डोळ्यांत पाणी. मोठं स्वप्न पुर्ण होता होता राहिलं याचा सल.... मोदींनी क्षणाचाही विचार न करता त्या माणसाला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि त्यांचा आवेग ओसरेपर्यंत त्यांना थोपटत राहिले, धीर देत राहिले.  के. शिवन जरा शांत झाल्यावर त्यांचा हात हातात घेऊन निरोप घेतला... हे दृष्य भारताचे पंतप्रधान आणि मोठ्या वैज्ञानिकातलं नव्हतं. तर दोन माणसांतलं होतं. ज्या दोघांचं स्वप्न एकच होतं. दोषारोप तर सोडाच मोदींनी माणूसकी व त्या पल्याड लिडरशीपचा उत्कृष्ठ वस्तुपाठ जगासमोर ठेवला. हे प्रोत्साहन असेल तर कुठली माणसं झोकून देऊन काम करणार नाहीत?? आपल्यामागे आपला नेता खंबीर उभा आहे, ही भावना जबाबदारीची जाणीव शेकडोपटीने वाढवणारी तरीही आश्वासक आहे...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments