देव कशाला म्हणायचं?

लहान होते तेव्हा..
देव कशाला म्हणायचं? 
बाबा : आपल्या श्रद्धास्थानाला.....
म्हणजे कशाला?
बाबा : अगदी कशालाही म्हण. ज्यावर तुझी खूप श्रद्धा असेल ते...
श्रद्धा, म्हणजे कसं?
बाबा : ज्याला मानशील तो सर्वश्रेष्ठ आहे व त्याला सगळं माहिती आहे.. इतका विश्वास ठेवायचा. 
त्याने काय होईल?
बाबा : त्याने आपण यशाने हुरळून जात नाही आणि अपयशाने खचूनही जात नाही......
त्याला सगळं माहिती असतं?
बाबा: हो तर. स ग ळं..... 
म्हणत बाबांनी हातावर ओलं खोबरं, खडीसाखर दिली...  राजुरचे दर्शन घेऊन झाल्यावर 'जरासे टेकावे' नियमाला अनुसरून बसलो तेव्हा झालेला हा संवाद मंद धुपाचा दरवळ, घंटानाद आणि दगडी मंडपातल्या आश्वासक गारव्यासकट मनात कोरला गेला. कदाचित जडण घडणीच्या काळातले प्रत्येक संवाद मनावर खोल परिणाम करत असतात.. मला बाबांनी देव इतका सोपा करून समजावला होता व तो निवडायचं स्वातंत्र्यही आपसूक देवून टाकलं होतं. त्या मंदिरातला, नजरेने "मी आहे" सांगणारा  बाप्पाच मी माझा देव म्हणून मुक्रर करत साखर- खोब-याचा बोकाणा भरलेला...  पुढे मोठी होताना तो ही माझ्यासोबतच मोठा होत गेला. त्यामुळे त्याच्याशी हितगूज अगदी समवयस्क मित्राप्रमाणे व्ह्यायचं...

पुढे इंजिनीअरींगकरता, उदगीर मिळालं.घर शोधाशोध करताना उदगीरभर पायपीट केली. शेवटी वट्टमवारांचं घर म्हणजे दोन खोल्या फायनल केल्या. मी आणि माझी आज्जी रहायचं ठरलं. सगळ्यात जास्त आनंदी तिच होती ( कदाचित दोन्ही सुनांच्या तावडीतून सुटल्याने असेल!!!) आपल्या देवघरासकट तिनं जामानिमा आणलेला. ओट्यावर देव गॅसपासून सुरक्षित अंतरावर स्थानापन्न झाले. बाहेरच्या खोल्यात फक्त मी आणि माझी (मला वजनाने न पेलणारी) पुस्तके. ते घर गमतीशीर होतं. म्हणाजे घराच्या भिंतींना कुठेही कप्पे, खण, कपाटं केलेली नाहीत. फक्त को-या करकरीत भिंती. बाहेरच्या खोलीला एक बाल्कनी. तिचं दार उघडलं 
व किचनचं दार उघडलं की वारा घरभर नाचायचा. 
                एकदा कॉलजातून येताना, रोडच्या बाजूला पोस्टर्स विकणरा तर्‍हेतर्‍हेचे पोस्टर मांडून बसलेला दिसला. गेल्या जमान्यातल्या राजेश खन्नापासून तेव्हा नुकता उगवलेल्या ह्रितीकपर्यंत आणि मधुबालेपासून ते ऐश्वर्यापर्यंत सगळे हजर होते. पलिकडल्या गठ्ठ्यात जटाधारी शंकरापासून, तुळजाभवानी पर्यंत नि दत्तात्रयापासून तिरूपती बालाजी पर्यंतचे सारे पोस्टर. बरं त्या पोस्टर्सचा आकार तरी काय सांगू? जणू काही रिअल साईज पोस्टर. हे मोठेच्या मोठे! मैत्रिणीने ऐश्वर्याचं मी बाप्पाचं पोस्टर घेतलं. पॉकेटमनीतून....
            वट्टमवारांच्या परवानगीने, अगदी माझ्या कॉटच्या समोर ते पोस्टर मी लावलं. त्या चित्रकाराच्या सुबकतेला माझ्या मनातून आजही दाद उमटते. प्रमाणबद्ध हात, आता बोलतील की काय असे भावूक डोळे, एक पाय गुढघ्यात मुडपून दुसरा खाली सोडलेला, पायाची बोटंही किती देखणी! पितांबराचा सुखद रंग... कुठेही बटबटीतपणा नसलेलं, गुलाबी कमळात बसलेला तो "गंपू" घरी आला आणि अगदी तिसरा व्यक्तीच घरात आल्यासारखं झालं.... त्याने चारही वर्षे मला अखंड साथ दिली. तेव्हाचं घराबाहेरचं जगणं बाबांच्या भाषेत सांगू तर त्याला खडा न् खडा माहिती आहे....   
        एका कोजागिरिला रात्रभर इंजिनिअरीग मॅकेनिक्सने भंजाळून टाकलं होतं. घड्याळ पुढे धावत होतं... पण उत्तरं अचूक येत नव्हती. दिवसभर कॉलेज वर्कशॉप झालेलं. त्यात ही असाईनमेंट सुटता सुटेना. कोजागिरीला जागतात पण हे असं? बरं गणितं सुटतील तर जागण्याचं समाधान तरी मिळेल. अशी अडले की आई आठवायची. ती जवळ घेऊन "कर कर प्रयत्न कर पुन्हा सोडवायला घे, जमेल, जमेल. तुला सगळं येतं" करून धीर द्यायची..." अशी उद्विग्न असताना कचकन लाईटच गेले. (उदगीरात ते नेहमीचं....) "काय आता हे गंपू??" अशा तक्रारीच्या सुराने त्याच्याकडे पाहिलं  आणि पहातच राहिले. कॉटशेजारच्या खिडकीतून चंद्र थेट त्याच्यावर उतरून आला होता..  अगदी धिटाईने चंद्र त्याच्याकडे बघत होता. कसलाही अडसर न येता निसर्ग आणि मानवी कलाकृतीची नजरानजर चाललेली.... सगळं बाजूला सारून मीही त्या चंद्रप्रकाशात त्याला किती वेळ न्याहाळत बसले आणि कधी खाली घसरून गाढ झोपले मला आठवत नाही... पण सकाळी माझी मेकॅनिक्सची गणितं सरसर सुटलेली.

    सांगत बसले तर शेकडो आठवणी आहेत. इंजिनिअर झाले. उदगीर सोडायची वेळ आली तेव्हा बांधाबांध करत होतो, त्यावेळी माझं लाडकं पोस्टर जणू त्या भिंतीचा एक भाग असल्यागत भिंतीला चिकटलेलं. ते काढायचा प्रयत्न करू लागले तर चित्र फाटेल अशी स्थिती झालेली. ती सुंदर कलाकृती तुकड्यांमधे हातात येऊन काय उपयोग झाला असता. वट्टमवार म्हणाले, "असू दे. आम्हाला तुझी नि आज्जीची आठवण". त्या पोस्टरला, त्याच्या चित्रकाराला मनोभावे नमस्कार करून निघाले. पण आजही डोळे मिटल्यावर गणेशाचे कुठले रूप नजरेसमोर येत असेल तर त्या चित्रातलेच..... 
-बागेश्री

Post a Comment

0 Comments